रोहिणीसह मार्गदर्शकाची होणार चौकशी
By Admin | Published: May 16, 2016 02:33 AM2016-05-16T02:33:25+5:302016-05-16T02:33:25+5:30
राज्य पंच व डोपिंग संदर्भात परिसंवाद अशा महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले
पुणे : महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या जिल्हा सचिवांच्या बैठकीत रोहिणी राऊत डोपिंग प्रकरणात चौकशी समितीची स्थापना, राज्य स्पर्धांचा वार्षिक कार्यक्रम, कालिकत येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा मैदानी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, राज्य पंच व डोपिंग संदर्भात परिसंवाद अशा महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
पुणे येथील मॅरेथॉन भवन येथे उपाध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीत रोहिणी राऊत डोपिंगप्रकरणी छत्रपती पुरस्कारप्राप्त आशियाई व राष्ट्रकुल रौप्यपदक विजेत्या व नागपूर हायकोर्टाच्या सरकारी अभियोक्ता अॅड. निवेदिता मेहता, माजी राष्ट्रीय खेळाडू व विदर्भ क्रिकेट संघटनेचे डॉ. प्रशांत राठी व जागतिक क्रॉसकंट्री स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या डॉ. शरद सूर्यवंशी यांची समिती स्थापन करण्यात आली. रोहिणी बरोबरच तिचे मार्गदर्शक अरविंद चव्हाण यांचीसुद्धा चौकशी ही समिती करेल. राज्य संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा जुनच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. ज्या मध्ये राज्य संघटने विरुद्ध घटनाबाह्य काम करणाऱ्या जिल्हा संघटना, व्यक्ती, पंच, मार्गदर्शक यांच्याबाबत समिती नेमून कारवाई करण्याचा अंतिम निर्णय घ्यावा, असे ही ठरले. भारतीय अॅथलेटिक्स महासंघ व महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटना; तसेच राज्य क्रीडा खाते यांनी राज्य संघटनेला दिलेल्या सहकार्याबद्दल खास अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
राज्यातील खेळाडूंची नोंदणी करणे, ओळखपत्र देणे, त्यासाठी आधार कार्र्ड, जन्म दाखला आदी सक्तीचे करणे यासाठी संदीप तावडे यांनी दोन दिवसांत अंतिम नियमावली तयार करून जाहीर करण्याचे ठरले. आजच्या या बैठकीला २७ जिल्हा सचिव व ४ जिल्ह्यांचे प्रतिनिधी असे ३१ सदस्य उपस्थित होते.
राज्य वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा जुनच्या दुसऱ्या आठवड्यात दरम्यान पुणे येथे २० वर्षांखालील वयोगट ३० सप्टेंबर व १ आॅक्टोबर दरम्यान रत्नागिरी येथे १८ वर्षां खालील वयोगट १७ व १८ सप्टेंबर दरम्यान सांगली येथे १६ वर्षांखालील वयोगट २३ व २४ सप्टेंबर दरम्यान नागपूर येथे १४ वर्षांखालील वयोगट २० व २१ सप्टेंबर धुळे येथे, तर सबज्युनियर स्पर्धा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, असा स्पर्धेचा वार्षिक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. कालिकत युवा राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व किरण भोसले (कोल्हापूर) व कोमल जगदाळे (सोलापूर) करणार आहे. या संघाचे मार्गदर्शक म्हणून विजय बेंगळे, तर प्रशिक्षक म्हणून रमेश गंगावणे यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यातील पंचांचे शिबिर जुलै महिन्यात नाशिक येथे घेण्यात येणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)