रोहितदादा प्रमाणेच मीही तुमचा नातू; उमेदवारीसाठी पवारांना आणखी एका नातवाचं साकडं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 04:11 PM2019-07-30T16:11:15+5:302019-07-30T16:11:21+5:30
माजी आमदार दिवंगत नारायणराव पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात नारायणराव पवार यांचे नातू ऋषीकेश पवार यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणातच खेड मतदार संघातून उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे खेडमधून ऋषिकेश पवार इच्छूक असल्याचे समोर आले.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून नेते पलायन करत आहेत. सत्ता येणार नाही, या भितीने आतापर्यंत २० हून अधिक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असताना तरुण नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. आता ऋषीकेश पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेवारीसाठी जाहीर सभेतच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना साकडे घातले.
माजी आमदार नारायणराव पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात नारायणराव पवार यांचे नातू ऋषीकेश पवार यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणातच खेड मतदार संघातून उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे खेडमधून ऋषिकेश पवार इच्छूक असल्याचे समोर आले.
रोहितदादा पवार यांना कर्जत-जामखेड मतदार संघातून उमेदवारी देण्यात येणार आहे. रोहित यांच्या प्रमाणेच मीही तुमचा नातूच आहे. मग मलाही खेड मतदार संघातून उमेदवारी द्यावी. मागील पाच वर्षांपासून मी मतदार संघात फिरत आहे. त्यामुळे मतदार संघाची चांगली माहिती झाली असून पक्षाने उद्याच्या विधानसभेत रोहितदादा यांच्यासोबत जाण्याची संधी द्यावी, असं ऋषीकेश पवार यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात म्हटले.
दरम्यान ऋषीकेश पवार यांनी भाषणात उमेदवारी मागणे शरद पवार यांना रुचले नाही. उमेदवारी ही खासगीत मागत असतात, भाषणात नव्हे, असं सांगताना ऋषीकेश यांना थोडं थांबण्याचा सल्ला पवारांनी दिला. अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्यानंतर पक्ष नव्याने उभा करण्यासाठी राष्ट्रवादीकडून आगामी विधानसभा निवडणुकीत तरुणांना संधी देण्यात येणार आहे. या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे तरुणांच्या कोट्यातून ऋषीकेश पावर यांना संधी मिळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.