रोहित पाटलांनी सांगितला 'तो' थरारक प्रसंग; आबा गेल्यानंतर काही महिन्यात असं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 01:23 PM2024-07-21T13:23:47+5:302024-07-21T13:24:22+5:30

आबा गेल्यानंतर पक्षाची मतदारसंघात झालेली पडझड, अनेक लोक आम्हाला सोडून गेले होते, नगरसेवक सोडून गेले त्याही परिस्थितीत लोकांनी आम्हाला साथ दिली असं रोहित पाटील म्हणाले.

Rohit Patil told the story of stone pelting on the family during Tasgaon Bazar Samiti elections | रोहित पाटलांनी सांगितला 'तो' थरारक प्रसंग; आबा गेल्यानंतर काही महिन्यात असं काय घडलं?

रोहित पाटलांनी सांगितला 'तो' थरारक प्रसंग; आबा गेल्यानंतर काही महिन्यात असं काय घडलं?

मुंबई - आबांच्या पश्चात अनेकदा मानापमानाचे प्रसंग आमच्या कुटुंबावर आले, आबा गेल्यामुळे काहींना मतदारसंघात नेतृत्व करण्याची संधी आहे असं वाटल्यानं ते विरोधात गेले. दंडुकेशाही, दडपशाहीचं राजकारण सुरू झालं असा आरोप करत रोहित पाटील यांनी त्यांच्यासह कुटुंबावर झालेल्या दगडफेकीचा थरारक प्रसंग सांगितला आहे.

रोहित पाटील म्हणाले की, मी दहावीत होतो, फेब्रुवारी महिन्यात आबांचं निधन झालं. आबा गेल्यानंतर मी बोर्डाच्या परीक्षा दिल्या. त्यानंतर एप्रिल महिन्यात पोटनिवडणूक लागली. त्यात सर्वपक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करायची ठरवलं. त्यात एक अपक्ष निवडणुकीत उभे राहिले तरीसुद्धा लोकांनी मोठ्या मताधिक्याने लोकांनी आईला निवडून दिले. जून महिन्यात बाजारसमितीची निवडणूक लागली. त्या बाजारसमितीच्या निवडणुकीत स्थानिक प्रतिनिधींना असं वाटलं की आता आबा गेलेत, आता ही संधी आहे. ज्याप्रकारे आबांविरोधात आपण कार्य केले आहे तसेच एकूण तासगाव तालुक्यात दडपशाही, दंडुकेशाहीचं वातावरण असायचं तशारितीने काहीतरी करता येतंय का असा प्रयत्न झाला असा आरोप त्यांनी केला. झी २४ तासनं घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात आई, मी बहिण, चुलते आणि १५-२० कार्यकर्ते तिथे होते. समोरून दगडफेक चालू झाली असं लक्षात येताच मतदान केंद्राजवळ एक लग्न कार्यालय होतं तिथे नेले आणि शटर बंद करून घेतले. पावसात पत्र्यावर पाणी पडताना जो आवाज येतो तशी दगडे त्या मंगल कार्यालयावर पडत होती. थोडं व्हेटिंलेशनसाठी पत्रा आणि शटरमध्ये गॅप होता. काही दगडंसुद्धा आत येत होती. आईसोबत ३-४ महिला होत्या. आबांचे जुने सहकारी आमच्यासोबत होते तेव्हा एक दगड माझ्यासमोर त्यांच्या डोक्यात बसला. त्यांच्या डोक्यावर मी रुमाल धरल्याचं आठवतंय. स्मितादिदी धाडसाने पुढे जात होती. एकूण आत असलेल्या सर्व लोकांची मानसिकता घाबरलेली होती. ती परिस्थिती मी बघितली. माझं वय १५-१६ वर्ष होतं. त्यामुळे जी भीती वाटत होती ती त्या कार्यालयात मोडली. यापेक्षा जास्त काही होऊ शकत नाही हा विचार माझ्या मनात आला असंही रोहित पाटलांनी म्हटलं.

दरम्यान, आबांच्या पश्चात जे त्यांचे सहकारी होते त्यांनी आमची वाटचाल सोयीस्कर करण्याचा प्रयत्न केला. आबा गेल्यानंतर पक्षाची मतदारसंघात झालेली पडझड, अनेक लोक आम्हाला सोडून गेले होते, नगरसेवक सोडून गेले त्याही परिस्थितीत लोकांनी आम्हाला साथ दिली. आपण कष्ट केले तर येणाऱ्या परिस्थितीवर मात करू शकतो हे कळालं. अनेकवेळा मानापमानाचे प्रसंग आले. जे लोक आबा असताना तासनतास घरी थांबायचे ते लोक भेटायलाही वेळ देत नव्हते अशी वेळ आली. तो फरक माझ्या कुटुंबाला जाणवत होता. हा अपमान कुठेतरी पचवायला शिकलं पाहिजे हे आजी सांगायची असं रोहित पाटील यांनी सांगितले. 

मतदारसंघात चांगली फळी तयार केली 

जे अधिकारी आबांसोबत काम करायचे, आबांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध असायचे त्यांच्या भेटीला गेलो तर ते वेळ देत नसायचे. तुमचं साधं ट्रॅफिक पोलीस ऐकत नाहीत तुम्ही राजकारण सोडून द्या असं कार्यकर्ते म्हणायचे. राजकारणाची सुरूवात आईचा भार कमी करावा, मतदारसंघात तिला जास्त फिरावं लागू नये म्हणून झाली. त्यातून आवड निर्माण झाली. पडझडीच्या राजकारणातून आम्हाला नवी फळी उभारायची होती. २०१६-१७ या काळात कुणी आमच्यासोबत यायला तयार नव्हते. मात्र आज जे माझ्यासोबत होते ते कुणी नगरसेवक आहेत, कुणी नगराध्यक्ष झालं, गावागावात फिरणारी मुले ग्रामपंचायत सदस्य झाले. चांगली फळी आम्ही तयार केली असा विश्वास रोहित पाटलांनी व्यक्त केला. 
 

Web Title: Rohit Patil told the story of stone pelting on the family during Tasgaon Bazar Samiti elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.