रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यातल्या'ट्विटर वॉर'नंतर आदित्य ठाकरे व भाजप आमदारांत'तू तू मै मै'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 03:34 PM2020-05-20T15:34:10+5:302020-05-20T15:47:28+5:30
परदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यावरुन ट्विटर 'वॉर'
पुणे: गेल्या काही दिवसांपासून कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात ट्विटरवर तुफान वाकयुद्ध रंगलेले आहे. दोघांपैकी कुणीही त्यात माघार घ्यायला तयार नाही. आरोपांच्या फैरीवर फैरी एकमेकांवर झाडणे सुरु आहे. हे ट्विटर युद्ध थांबायचे नाव घेत नसताना आता त्यात पर्यांवरणमंत्री आदित्य ठाकरे आणि पुण्याचे शिवाजीनगर मतदारसंघाचे युवा भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या 'ट्विटर 'वर जोरदार शाब्दिक घमासान सुरु झाले आहे. कोरोनाच्या काळातलं हे पेटलेले राजकारण सोशल मीडियावर चांगलंच चर्चेचा विषय ठरत आहे.
परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यात ट्विटर वॉर झाले. केंद्र सरकार व राज्य सरकारचा संदर्भ या वादाला आहे. केंद्रातील सरकार मदत करत नाही असा आदित्य यांचा तर राज्यातील सरकारमध्ये गोंधळाचे वातावरण आहे असे सिद्धार्थ यांचा या वादात सूर आहे.
परदेशस्थ भारतीयांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रायल, एअर इंडिया यांनी पावले उचलावीत असे ट्विट आदित्य यांनी काही दिवसांपुर्वी केले होते. त्याला प्रतिसाद देताना आमदार सिद्धार्थ यांनी देशातील अन्य राज्यांनी याप्रश्नाबाबत त्वरीत हालचाल केली असून केंद्र सरकारने त्यांना पुर्ण सहकार्य केले आहे असा दावा करत महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मात्र कसलाही समन्वय नाही, या प्रवासासाठी लागणाऱ्या विशेष परवानग्या वगैरे लवकर दिल्या जात नाहीत असे निदर्शनास आणले. राज्य सरकारमध्ये गोधळाचे वातावरण असून त्यामुळेच राज्यातील काही हजार नागरिकांना परदेशातच अडकून पडावे लागले असल्याची टिका सिद्धार्थ यांनी केली.
आमदार सिद्धार्थ यांची ही टिका आदित्य यांच्या पचनी पडली नाही. त्यांनी लगेचच त्यांना ट्विटर वरूनच उत्तर दिले. '' तुम्ही युवा आमदार असल्याने भाजपाच्या ट्रोल आर्मीत नसाल, कोरोना संकटाच्या काळात दोषारोप करण्यावर तुमचा भर नसेल असे वाटले होते. परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय यांच्या संपर्कात आम्ही आहोत. राजकारण करण्याची ही वेळ नाही. केंद्र सरकारच्या मंत्रालयांशी आम्ही समन्वय ठेवून आहोत. एकमेकांकडे बोटे दाखवून काही साधणार नाही. त्याऐवजी विमान उड्डाणांच्या नियोजनात लक्ष देवून तिकिटांसह इतर समस्यांबाबत मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असा सल्लाही आदित्य यांनी सिद्धार्थ यांना दिला.''
''सिद्धार्थ यांनीही मग जोरदार उत्तर दिले. मी काही ट्रोलर नाही. मी निवडून आलेला आमदार आहे व सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. चुकीची टाकलेली पावले आणि संवादाचा अभाव याबद्दल मी राज्य सरकारलाच जबाबदार धरतो. दरम्यान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या या ट्विटर वॉरमध्ये सिद्धार्थ यांची पाठराखण करण्यासाठी धाव घेतली. मुंबई मध्ये विमानाच्या लँडिंग ला राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळेच विविध देशात अडकून पडलेली महाराष्ट्रातील मंडळी मायदेशी परतू शकत नाहीत. अन्य राज्य सरकारे मात्र त्यांच्या राज्यातील नागरिकांना परवानगी देत आहेत असे ट्विट त्यांनी केले.''
शिरोळे म्हणाले, यात कोणाला ट्रोल करण्याचा प्रश्नच नव्हता. तो निर्माण करून मंत्री आदित्य यांनीच यात राजकारण आणले. राज्य सरकारच्या संबधित विभागात त्यांनी विचारणा करावी व रखडलेल्या गोष्टी मार्गी लावाव्यात, त्यामुळे परदेशात अडकलेले राज्यातील नागरिक आपापल्या घरी परतू शकतील.