'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 03:40 PM2020-07-07T15:40:49+5:302020-07-07T16:11:33+5:30
"महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भाजपाच सोशल मीडियाच्या माध्यमातून दुफळीचे चित्र दाखवत आहे. मात्र अशी कोणतीही गोष्ट नाही."
पुणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सुरुवातीपासून होत आहे. यातच विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अंतर्गत वादातून पडणार असल्याचा दावा केला आहे. यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारमध्ये दुफळी असल्याचे चित्र भाजपाच दाखवत आहे. मात्र, अशी कोणतीही परिस्थिती नाही. देवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. भाजपाच सोशल मीडियाच्या माध्यमातून दुफळीचे चित्र दाखवत आहे. मात्र अशी कोणतीही गोष्ट नाही. देवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही. त्यांना वाटत असेल, असेच काहीतरी व्हावे. पण, सरकारमध्ये संवाद आणि चर्चा होत आहे. एक हाती कारभार आमच्यात नाही. आम्ही चर्चा करुन अनुभवाचा फायदा घेऊन लोकहिताचे निर्णय घेतो, असे रोहित पवार यांनी सांगितले.
याचबरोबर, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यासाठी यूजीसीकडून गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार येत्या सप्टेंबरच्या अखेरीस परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठांना देण्यात आले आहेत, यावरही रोहित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांविषयी सरकारने वेगवेगळ्या संघटनांशी बोलून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. देशात सर्व राज्यात सर्वात जास्त मुलं महाराष्ट्रात शिक्षण घेतात. त्यामुळे सर्वांचा एकत्रित निर्णय घेण्याऐवजी राज्याचा वेगळा निर्णय घेणे अपेक्षित आहे."
सारथी संस्थेबाबत रोहित पवार म्हणाले, "या प्रकरणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली आहे. इतर अनेक व्यक्ती बोलले आहेत. मी साधा कार्यकर्ता आहे. माझे आघाडीपेक्षा काही वेगळे म्हणणे नाही." तसेच, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय कोर्टात आहे. सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे आणि निर्णय घेत आहे. मात्र, हे प्रकरण कोर्टात असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
आणखी बातम्या...
घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल
अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी
Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता
21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार? केवळ दहा हजार भाविकांना परवानगी
चीनला पुन्हा झटका, भारतानंतर आता 'हा' देश टिकटॉवर बंदी घालण्याच्या तयारीत