"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 04:35 PM2024-07-04T16:35:27+5:302024-07-04T16:37:19+5:30
भारतीय संघ मुंबईत दाखल होत असून, येथे संघाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
मुंबई : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत रंगलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर विश्वविजेता भारतीय संघ आज मायदेशात परतला आहे. नवी दिल्ली विमानतळावर सर्व चाहत्यांनी संघाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. आता भारतीय संघ मुंबईत दाखल होत असून, येथे संघाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
मुंबईत भारतीय संघाची भव्य मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा गौरव कार्यक्रम होणार आहे. याकडे सर्व क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागले आहे. हजारो मुंबईकर हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवणार आहेत. दरम्यान, भारतीय संघाच्या मिरवणुकीसाठी जी बस सज्ज झाली आहे. ती बस खास गुजरातहून मागवण्यात आली आहे. यावरुन आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
"आमचे खेळाडू चांगले खेळले. आम्ही विश्वचषक जिंकला. भारतीय संघ विश्वचषकासह महाराष्ट्रात, मुंबईत येत आहे. मग, ही विजयी मिरवणूक महाराष्ट्रातील बसमधूनच खासकरून मुंबईतील बेस्ट बसमधून काढायला हवी. कारण, मुंबई शहर प्रवासाच्या बाबतीत अत्यंत सुखद आहे, मग मुंबईत विश्वचषक येत असेल तर बेस्टच्या बसचा वापर केल्यास आम्हाला आनंद होईल", असे रोहित पवार म्हणाले.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, "भारतीय संघाच्या विजयी मिरवणुकीसाठी आलेल्या गुजरातच्या बसला आम्ही पार्किंगसाठी चांगली जागा देऊ. बीसीसीआयने मोठी आणि चांगली बस आणली असेल, पण आमच्या भावना बेस्टसोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे बेस्ट बसचा वापर केला पाहिजे. त्यासाठी आम्ही बीसीसीआयकडे विनंती करू, शेवटी तेच निर्णय घेतील", असे रोहित पवार यांनी म्हटले.
#WATCH | Mumbai: NCP SCP leader Rohit Pawar says, "Our players played well. We won the World Cup. But, if the World Cup is coming to Maharashtra for the victory parade, then 'BEST' (BEST Bus Transport) Bus should be used. As we are emotionally connected with the 'BEST' (BEST Bus… pic.twitter.com/2ZPgkwG5rI
— ANI (@ANI) July 4, 2024
दरम्यान, आज संध्याकाळी विश्वविजेत्या भारतीय संघाचा सत्कार वानखेडे स्टेडियम येथे होणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी ५ वाजल्यापासून मरीन ड्राईव्हवर विजय मिरवणूक आणि वानखेडेवर महोत्सव साजरा केला जाणार आहे. २९ जून रोजी बार्बाडोस येथे झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत विश्वविजेतेपदावर कब्जा केला होता.
महाराष्ट्रीयन खेळाडूंचा मुंबईत सत्कार
टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य असलेल्या चार महाराष्ट्रीयन खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार होणार आहे. राज्य सरकारने या खेळाडूंचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैयस्वाल हे चार खेळाडू आहेत. ज्यांचा समावेश विश्वचषक विजेत्या भारतीय संघामध्ये होता. तर भारतीय संघाचे बॉलिंग कोच पारस म्हांब्रे देखील मुंबईकर आहेत. या सर्वांचा विधीमंडळात सत्कार केला जाणार आहे.