"या सगळ्यात महाराष्ट्र कुठंय?"; Foxconnच्या प्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 07:56 PM2024-08-17T19:56:48+5:302024-08-17T20:18:03+5:30
फॉक्सकॉनच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केलीय.
Rohit Pawar : वेदांता-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही महिन्यांपूर्वी महायुती सरकारवर हल्लाबोल केला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी तो गुजरातला पळवण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. आता पुन्हा एकदा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी फॉक्सकॉन कंपनीवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी फॉक्सकॉन कंपनीच्या प्रमुखांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी सरकारला घेरलं आहे.
आघाडीची कंत्राटी उत्पादक कंपनी फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. भारतात सातत्याने गुंतवणूक वाढवणाऱ्या तैवानच् फॉक्सकॉनया कंपनीच्या अध्यक्षांनी बैठकीत पंतप्रधानांशी अनेक विषयांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी या भेटीची माहिती ट्वीट करुन दिली होती. फॉक्सकॉन ही तैवानमधील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. तर सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड पहिल्या क्रमांकावर आहे. यावरुनच रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली.
"फॉक्सकॉन उद्योग समूहाचे अध्यक्ष भारतात आले असून त्यांनी पंतप्रधानांसह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या. कर्नाटकात तर फॉक्सकॉन ही कंपनी त्यांचा चीननंतरचा जगातला सर्वांत मोठा दुसरा प्लांट उभारत आहे. या सर्व घडामोडी होत असताना या सर्वांमध्ये महाराष्ट्र कुठंय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अधिवेशनात सेमीकंडक्टरचा विषय वारंवार सरकारच्या लक्षात आणून दिला, परंतु सरकारच्या प्राथमिकता वेगळ्याच राहिल्या. राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी डबल इंजिनची नाही तर सत्ताधाऱ्यांच्या इच्छाशक्तीची गरज असते. दुर्दैवाने ती इच्छाशक्ती महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांकडं नाही ही वस्तुस्थिती आहे. सत्ताधारी म्हणजे धूर्त कोल्ह्यांच्या तीन टोळ्या असून केवळ #लाडक्या खुर्चीसाठी दिल्लीचे दौरे करण्यात माहीर आहेत. पण, राज्यात मविआ सरकार आल्यानंतर मात्र हा अनुशेष नक्की भरून काढला जाईल, याची खात्री आहे," असे रोहित पवार यांनी म्हटलं.
फॉक्सकॉन-वेदान्तचा काडीमोड
महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर तैवानस्थित फॉक्सकॉन कंपनीने उद्योगपती अनिल अगरवाल यांच्या ‘वेदान्त लिमिटेड’बरोबर सेमिकंडक्टर चिपनिर्मितीच्या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले होते. यासाठी फॉक्सकॉनने कोणतेही विशिष्ट कारण दिले नसले तरी भागीदारी संपुष्टात आल्याने आधी महाराष्ट्रात नियोजित असलेला आणि ऐन वेळी गुजरातकडे वळविलेला हा प्रकल्प धोक्यात आला होता.