मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही; रोहित पवार म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 05:10 PM2019-12-31T17:10:35+5:302019-12-31T17:10:55+5:30
ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असून, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे.
मुंबई- ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असून, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. तसेच त्यांच्याकडे वित्त खातं सोपवलं जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु रोहित पवार यांना मंत्रिपद न मिळाल्यानं ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिल्यानं या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर त्यांनीच या नाराजीनाट्यावर पडदा टाकला आहे.
टीव्ही 9शी बातचीत करताना ते म्हणाले, राज्यात अनेक लोक फिरत असतात, त्यात मीसुद्धा आहे. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही. नाराजी बाजूला ठेवून काम करायचं आहे. मला मंत्रिपद मिळावं यासाठी ज्यांनी कोणी प्रयत्न केले असतील त्यांचा मी आभारी आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची क्षमता प्रत्येक युवकामध्ये आहेत. जी जबाबदारी आपल्यावर दिलेली असते ती समर्थपणे पार करण्याची क्षमता प्रत्येक युवकामध्ये आहे. त्या युवकांमध्ये मीसुद्धा येतो, असा माझ्या फेसबुक पोस्टचा अर्थ आहे. आमदार म्हणून मी पहिल्यांदाच नगरमधून निवडून आलेलो आहे. राज्यात असलेली महाविकासआघाडी नगर जिल्ह्यातही दिसतेय. लोकांच्या हितासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा विजय हा त्या लोकांचाच होतो. आज या ठिकाणी महाविकास आघाडीचाच विजय होईल, असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
आजवर मला मिळालेल्या प्रत्येक संधीच सोनं करण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात अधिकाधिक अनुभव घेऊन कार्यरत राहत आपला विश्वास कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करेल. सर्व खात्यांच्या मंत्र्यांसोबत सहकार्याची भावना ठेवून मतदारसंघासोबतच एक तरुण लोकप्रतिनिधी म्हणून मी राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल. लोकप्रतिनिधी या नात्याने अधिकाधिक अनुभव घेऊन कार्यरत राहील. पुन्हा एकदा नवनियुक्त मंत्रिमंडळाचे विशेषत: ज्या युवक प्रतिनिधींना ही संधी मिळाली त्यांचे हार्दिक अभिनंदन, असंही ते म्हणाले आहेत.