आजोबा, तुम्ही पुनर्विचार करा, निवडणूक लढा; शरद पवारांच्या दुसऱ्या नातवाची गळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 11:23 AM2019-03-12T11:23:54+5:302019-03-12T11:57:26+5:30

आपल्या नातवासाठी - पार्थ पवारसाठी आजोबा शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत माघार घेतली आहे.

Rohit Pawar request Sharad Pawar to contest Lok Sabha election 2019 | आजोबा, तुम्ही पुनर्विचार करा, निवडणूक लढा; शरद पवारांच्या दुसऱ्या नातवाची गळ

आजोबा, तुम्ही पुनर्विचार करा, निवडणूक लढा; शरद पवारांच्या दुसऱ्या नातवाची गळ

googlenewsNext

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचे संकेत सोमवारी दिले आहेत. आपल्या नातवासाठी - पार्थ पवारसाठी आजोबा दोन पावलं मागे येणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांची मावळमधील उमेदवारी जवळपास निश्चित मानली जातेय. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असताना, शरद पवार यांच्या दुसऱ्या नातवानं - रोहित पवार यानं आजोबांना निवडणूक लढवण्याची गळ घातली आहे. साहेब, आपण निर्णयाचा पुनर्विचार करा, निवडणूक लढा, असा हट्टच त्यानं फेसबुक पोस्टद्वारे केला आहे. त्यामुळे या नातवाचं मन आजोबा राखणार का, यावरून तर्कवितर्क सुरू झालेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, २०१९ची प्रतिष्ठेची लोकसभा निवडणूक लढवण्यास शरद पवार तयार झाले होते. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातून ते रिंगणात उतरतील, हे जवळपास निश्चितच होतं. परंतु, काही दिवसांनी पार्थ पवार या उदयोन्मुख नेत्याच्या उमेदवारीचे वारे वाहू लागले. मावळ मतदारसंघातून त्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या हालचालींना वेग आला. त्यावरून होय-नाही सुरू असतानाच, रविवारी निवडणूक जाहीर झाली आणि सोमवारी शरद पवारांनी अचानक यू-टर्न घेतला. एकाच कुटुंबातील किती जणांनी निवडणूक लढवायची?, यावर घरात विचार झाल्याचं सांगत पवारांनी माघार घेण्याचं सूतोवाच केलं आणि पार्थच्या उमेदवारीला हिरवा कंदीलही दिला. 

या बातमीनंतर संध्याकाळीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा शरद पवारांना साद घातली होती. त्यानंतर, आज सकाळी रोहित पवार याची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. 'तुमच्या प्रत्येक निर्णयाचा आदर आहे, पण आदराच्या पुढे प्रेम असतं. या प्रेमाखातरच आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा', अशी आग्रही विनंतीच रोहित पवारनं केली आहे.

  

अर्थात, शरद पवारांनी माघार घेण्यामागे नातवाची उमेदवारी हे एकच कारण नसून इतरही चार कारणं असल्याचं बोललं जातंय. पार्थच्या उमेदवारीसाठी अजित पवारांची आग्रही भूमिका, विजयसिंह मोहिते-पाटील गटाची नाराजी, २००९ साली दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याचा आरोप आणि 'माढा... बारामतीकरांना पाडा' ही सोशल मीडियावरील पोस्ट हीसुद्धा पवारांच्या माघारीमागची कारणं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे शरद पवार निर्णयाचा पुनर्विचार करण्याची शक्यता थोडी कमीच दिसतेय. त्यामुळे रोहित पवारच्या फेसबुक पोस्टमागे, राष्ट्रवादीत अंतर्गत कुरबुरी नाहीत, पार्थच्या उमेदवारीमुळे रोहित अस्वस्थ नाही, पवारांनी पार्थसाठीच माघार घेतली आहे, हे ठसवण्याचाच हेतू दिसतोय. 




Web Title: Rohit Pawar request Sharad Pawar to contest Lok Sabha election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.