"राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय, किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये", रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:30 AM2022-05-17T11:30:41+5:302022-05-17T11:32:12+5:30
Rohit Pawar : भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये, असे म्हणत या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
मुंबई : पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी निषेध केला आहे. याप्रकरणी ट्विट करत रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये, असे म्हणत या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
काल पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या मराठीत अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात आंदोलन करत स्मृती इराणी यांचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन सुरु झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा घटनास्थळी येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेचा रोहित पवार यांनी ट्विटद्वारे निषेध नोंदवला आहे. गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे.@smritiirani
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 17, 2022
याचबरोबर, भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी सुद्धा रोहित पवार यांनी केली आहे. तसेच, चंद्रकात पाटील आणि देवेंद्र फडणवीस आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
विनयभंगाचा गुन्हा दाखल
याप्रकरणी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून भस्मराज तिकोणे (रा. कसबा पेठ, पुणे), प्रमोद कोंढरे ( रा. नातूबाग, पुणे) आणि मयूर गांधी (रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालगंधर्व रंगमंदिर येथे अमित शाह आणि भाजपाची वाटचाल या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन सुरु होते. यावेळी स्मृती इराणी यांना वाढत्या महागाई आणि घरगुती गॅसच्या किमतीबाबत राष्ट्रवादीच्या महिला निवेदन देण्याकरिता गेल्या होत्या. त्यावेळी भाजपच्या या तीन कार्यकर्त्यांनी महिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच साडीचा पदर ओढून अश्लील हातवारे केले. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.