रोहित पवारांनी 'ती' घोषणा थांबवली, सोशल मीडियातून होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 06:15 PM2019-10-25T18:15:38+5:302019-10-25T18:18:13+5:30
राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील कार्यकर्त्यांची
मुंबई - भाजपाचे मंत्री प्रा. राम शिंदेंना पराभूत करत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार जायंट किलर ठरले. कर्जत जामखेडमध्ये पवार यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर, विजयी सभेला संबोधित करताना रोहित यांनी आपल्यातील संयमी आणि संस्कृत राजकीय नेत्याचं दर्शन घडवलं. रोहित यांनी आपल्या विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना, राम शिंदेंबद्दल आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना जागीच थांबवलं. तसेच, या घोषणेऐवजी शरद पवारांच्या समर्थनार्थ घोषणा देण्याचं सूचवलं. विशेष म्हणजे स्वत:च या घोषणेची सुरुवात केली.
राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आणि जनतेची मने जिंकली आहेत. लोकसभा निवडणूकांपासूनच रोहित यांनी मतदारसंघातील जनतेमध्ये स्वत:ला एकरुप केलं होतं. येथील जनतेनंही रोहित यांच्यावर प्रेम करत त्यांना आपला आमदार बनवलं आहे. रोहित यांनी निकालानंतर आपल्या घराजवळ विजयी सभा घेतली. त्यावेळी, मला निवडणूक देणाऱ्या जनतेच, माझ्यासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं आभार मानलं. तसेच, मदत करणाऱ्या मित्रपक्षांचं, शिवसेना नेत्यांचं आणि भाजपा नेत्यांच तर विचारूच नका, असे म्हणत सर्वांचेच आभार मानले. रोहित यांनी भाजपाचे दिग्गज नेते आणि मंत्री राम शिंदेंचा पराभव केला.
आपल्या विजयी सभेला संबोधित करताना, रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी राम शिंदेंच्या विरोधात घोषणा दिल्या. कोण आला रे कोण आला.... राम शिंदेंचा बाप आला.... अशा घोषणा रोहित यांच्या समर्थकांनी दिल्या होत्या. या घोषणेला रोहित यांनी तात्काळ आक्षेप घेतला. कृपया अशा घोषणा देऊ नका, आपण पवारांचे कार्यकर्ते आहोत. अशा घोषणा देऊ नका म्हणत रोहित यांनी या घोषणा थांबवल्या. त्यानंतर, स्वत:च पवारसाहेब तुम आगे बढो.... हम तुम्हारे साथ है... अशी घोषणाबाजी केली. रोहित यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनाही राम शिंदेंच्या विरोधातील घोषणेचा विसर पडला. मात्र, रोहित यांच्या या एका कृतीने अनेकांची मने जिंकली. सोशल मीडियावर रोहित यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
दरम्यान, रोहित यांच्या मातोश्री सुनंदा राजेंद्र पवार यांचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी कर्जत जामखेडमधील जनतेचे आभार मानले आहेत. 'राजकारणातील हे रोहितचे सर्वात मोठे व जोखमीचे पाऊल होते. कर्जत-जामखेडला त्यांची सर्वात जास्त गरज असल्याचे रोहितला लक्षात आले आणि त्याने इथे निवडणूक लढविण्याचे ठरवले आणि तो जिंकलाही. मूळात, आजचा विजय हा रोहितचा नाही तर, त्या यशोदा मातांचा आहे, ज्यांनी रोहितला त्यांचा ओटीत घेतलं. आजचा विजय त्या वानर सेनेचा आहे, ज्यांनी निस्वार्थीपणे रोहितच्या पाठीमागे उभे राहिले आणि हा विजय त्या तरुणाचाही आहे, ज्यांनी दारूला झुगारून रोहितचे हात बळकट केले,' अशा शब्दांत सुनंदा पवार यांनी कर्जत जामखेडमधल्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत.