रोहित पवार आमदार झाले; 'गेट वे'वर लगेचच सामान्यांत मिसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 11:52 AM2019-11-28T11:52:26+5:302019-11-28T11:53:33+5:30
रोहित पवार गेट वे ऑफ इंडियावर फेरफटका मारायला आल्याचे पाहून तेथे आलेल्या पर्यटकांनी सेल्फीसाठी गर्दी केली.
मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पवार कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात उतरवता आली नसली तरी विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्या आमदारकीने हे शक्य झाले आहे. रोहित पवार यांनी त्यांच्या मातोश्रींचे नाव घेत काल आमदारकीची शपथ घेतली. यानंतर त्यांनी थेट जवळच असलेला गेट वे ऑफ इंडिया गाठला.
रोहित पवार गेट वे ऑफ इंडियावर फेरफटका मारायला आल्याचे पाहून तेथे आलेल्या पर्यटकांनी सेल्फीसाठी गर्दी केली. यावेळी जो तो त्यांना त्यांचा मतदारसंघ आणि राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव सांगत होता. रोहित पवार त्यांच्याशी हसत खेळत बोलत सेल्फी देत होते.
रोहित पवार यांनी महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच घेतलेले आहे. यामुळे कॉलेज जिवनाल्या आठवणीही त्यांनी ताज्या केल्या. आमदार झाल्यावर एखाद्या नेत्यासोबत कार्यकर्त्यांचा तामझाम, मोठमोठ्या गाड्यांचा ताफा आणि तेवढेच ऐटीत वावरणे आदी ओघानेच येते. परंतू रोहित पवार यांचे पवार कुटुंबातील सदस्य असूनही सामान्यांमधला वावर सामान्यासारखाच होता. भेटायला येणाऱ्या सर्वांशी हास्तांदोलन करत चिमुकल्यांशी संवाद साधला.
यानंतर पुण्यातील वयोवृद्धांसोबत सायकलिंगचाही आनंद घेतला. या वयोवृध्दांचा ग्रुप गेल्या काही वर्षांपासून पुणे ते मुंबई अशी सायकल फेरीचे आयोजन करत असतो.