२०१९ मध्ये रोहित पवार भाजपकडे तिकीट मागायला गेलेले; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 17:11 IST2024-04-14T17:10:36+5:302024-04-14T17:11:15+5:30
एकमेकांना धमक्या, इशारे, लायकी आदी गोष्टींमुळे राजकीय वातावरण या उकाड्यात आणखी तापू लागले आहे. मुळ विरोधकाला सोडून हे चारही गट एकमेकांवरच टीका करण्यात व्यस्त झाले आहेत.

२०१९ मध्ये रोहित पवार भाजपकडे तिकीट मागायला गेलेले; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमधील दोन गटांमध्येच अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. मुळ विरोधकाला सोडून हे चारही गट एकमेकांवरच टीका करण्यात व्यस्त झाले आहेत. यामुळे एकमेकांना धमक्या, इशारे, लायकी आदी गोष्टींमुळे राजकीय वातावरण या उकाड्यात आणखी तापू लागले आहे. आज राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी रोहित पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
जागावाटपावर बोलताना तटकरे यांनी नाशिकवर दावा असल्याचे म्हटले आहे. या जागेबाबत निर्णयास्पद चर्चा झालेली आहे आज किंवा उद्या बैठक होईल आणि नाशिकचा तिढा सुटेल, असे तटकरे म्हणाले. तसेच साताऱ्याच्या जागेबाबत देखील चर्चा झालेली आहे राजकारणात नेहमी परिवर्तन होत असते. माढामध्ये जे काही घडलं ते सर्वांना माहिती आहे, असे तटकरे म्हणाले.
रोहित पवारांच्या भावा-बहीणीतील करारावरील वक्तव्यावर तटकरे यांनी भाष्य केले आहे. भावा बहिणीचा कुठला करार झाला आहे, मला माहीत नाही. 2019 मध्ये रोहित पवार भाजपाकडे तिकीट मागायला गेले होते, कदाचित तो करार असावा. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्याच्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून भाजपकडे जावे यावर रोहित पवार यांची सही होती. त्या कराराची त्यांना आठवण झाली की काय माहित नाही, असा टोलाही तटकरे यांनी लगावला.
शरद पवार यांनी जे काही वक्तव्य केले, त्याबाबतची प्रतिक्रिया मी काही देणार नाही सुनेत्रा वहीनींची प्रतिक्रिया मात्र बोलकी आहे, असे तटकरे म्हणाले. याचबरोबर त्यांनी गीते यांच्यावरही तोंडसुख घेतले. 2019 मध्ये काँग्रेस, शेकाप माझ्यासोबत होता, याबाबत दुमत नाही. 2019 मध्ये गीतेंसोबत मोदी साहेबांची ताकद, अखंड शिवसेना त्यांच्या पाठीमागे होती. हद्दपारीची भाषा त्यांच्या तोंडी जास्त शोभते, कारण 2019 मध्ये जयंत पाटील यांचं संस्थान खालसा केल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी दर्पोक्ती देखील केली होती, असे तटकरे म्हणाले.