'दादा येता का मदतीला?'... म्हणताच रोहित पवारांनी शेतात जाऊन काढली ज्वारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 10:51 AM2022-02-23T10:51:18+5:302022-02-23T10:54:07+5:30
Rohit Pawar : सधा रोहित पवार आपल्या अहमदनगरच्या जामखेड मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेताना दिसून येत आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँगसचे आमदार रोहित पवार हे कोणत्या-ना-कोणत्या कारणाने सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. सधा रोहित पवार आपल्या अहमदनगरच्या जामखेड मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेताना दिसून येत आहे. यादरम्यान ज्वारीची काढणी करणाऱ्या एका महिलेने 'दादा येता का मदतीला?' असे म्हणत रोहित पवार यांना ज्वारी काढणीसाठी बोलावले. यानंतर त्यांनी शेतात जाऊन ज्वारी काढण्यासाठी त्या महिलेला मदत केली. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.
रोहित पवार म्हणाले, "सध्या ज्वारीची काढणी सुरू आहे. मतदारसंघात असताना ज्वारी काढण्यासाठी जात असलेल्या एका भगिनीची रस्त्यात भेट झाली असता, 'दादा येता का मदतीला?' असे हक्काने विचारले आणि मीही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही वेळ ज्वारी काढण्यास त्यांना मदत केली.", याचबरोबर, दुसरे ट्विट करत शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी अजूनही अनेक कामे माणसांनाच करावी लागतात. यातलंच एक काम म्हणजे ज्वारीची काढणी! त्यासाठी किती कष्ट करावे लागतात याचाही अनुभव यावेळी आला, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
सध्या ज्वारीची काढणी सुरू आहे. मतदारसंघात असताना ज्वारी काढण्यासाठी जात असलेल्या एका भगिनीची रस्त्यात भेट झाली असता, "दादा येता का मदतीला?" असं हक्काने विचारलं आणि मीही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काही वेळ ज्वारी काढण्यास त्यांना मदत केली. pic.twitter.com/vfq4d5QNFN
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 22, 2022
दरम्यान, नुकतेच रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत मिसळ खात असल्याचा फोटो शेअर केला होता. यावेळी एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने '35 मिसळ' खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झाले, असे गमतीदार ट्विट रोहित पवार यांनी सोमवारी केले होते. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी 'देवेंद्र यांनी ३५ पुरणपोळ्या, पातेलंभर तुपात खाल्ल्या होत्या', असे विधान केले होते. त्या विधानावरूनच रोहित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली असावी, अशी खमंग चर्चा मतदारसंघात सुरू होती.