सूर्याचा ‘तो’ झेल अन् हास्याचे चौकार, षटकार; विधानभवनात विश्वविजेत्या खेळाडूंचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 08:59 AM2024-07-06T08:59:00+5:302024-07-06T09:00:27+5:30
मी काय बोलू... तो कॅच बसला हातात... बस्स... - सूर्यकुमार यादव | बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला, नाही तर मीच त्याला बसवला असता... - रोहित शर्मा
मुंबई - टी-२० वर्ल्डकप विजेत्या भारतीय क्रिकेट संघातील मुंबईतील कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा शुक्रवारी विधानभवनात सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आदी या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी सूर्यकुमारच्या मॅचविनिंग झेलवर खूप मिश्कील कोट्या झाल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सूर्यकुमारजी तुम्ही ज्या पद्धतीने कॅच घेतली, तसेच आमच्या ५० जणांच्या टीमने दोन वर्षांपूर्वी एकाची विकेट घेतली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : सूर्यकुमारदेखील म्हणत असतील, बरं झालं हा झेल माझ्या हातात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार : रोहितने सांगितलंच की, तू झेल घेतला नसता, तर तुला बघितलं असतं... पण रोहितने एकट्याने बघितलं नसतं, तर आम्ही सगळ्यांनीच ‘बघितलं’ असतं...