रोहित्र होणार अधिक सुरक्षित
By admin | Published: May 18, 2016 12:58 AM2016-05-18T00:58:37+5:302016-05-18T00:58:37+5:30
सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या धोकादायक रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले
पुणे : सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या धोकादायक रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे. या रोहित्राला आग लागल्याने तसेच शॉर्टसर्किटमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन मार्च महिन्यापासून ही सुरक्षा आवरणे बसविण्यात येत आहेत.
महावितरणकडून करण्यात आलेल्या पाहणीत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह राजगुरुनगर, मंचर व मुळशी विभागातील एकूण ७४४ धोकादायक रोहित्रे आढळून आली होती. या रोहित्रांच्या ठिकाणी अपघातांचा धोका असल्याने सुरक्षा आवरण लावण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी ४२ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.
आतापर्यंत १00 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावण्यात आलेले आहेत. रोहित्रांच्या चारही बाजूने तसेच रोहित्रखाली लोखंडी पत्र्यांचे सुरक्षा आवरणामुळे वीजखांबावरील रोहित्रांमध्ये बिघाड, आॅईल गळती, स्पार्किंग आदींमुळे परिसरातील धोका कमी होणार आहे.
गणेशखिंड मंडलातील पिंपरी, कोथरूड, भोसरी, शिवाजीनगर विभागात एकूण ३५२, रास्तापेठ मंडलातील नगर रोड, पद्मावती, पर्वती, रास्तापेठ, बंडगार्डन विभागात एकूण १३७ तर पुणे ग्रामीण मंडलातील मंचर, राजगुरुनगर, मुळशी विभागात २५५ धोकादायक रोहित्रांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)