नोकरशहांची भूमिका महत्त्वाची
By admin | Published: October 4, 2015 12:59 AM2015-10-04T00:59:03+5:302015-10-04T00:59:03+5:30
महाराष्ट्रात उद्योगस्नेही वातावरण निर्माण व्हावे, येथील उद्योगांची भरभराट व्हावी यासाठी राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
- प्रवीण तापडिया (लेखक विदर्भ इंडस्ट्रीज असोसिशनचे माजी अध्यक्ष आहेत.)
महाराष्ट्रात उद्योगस्नेही वातावरण निर्माण व्हावे, येथील उद्योगांची भरभराट व्हावी यासाठी राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आणि हे करीत असताना सरकारचा हेतू अथवा प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्याचे काही कारण नाही. त्यामुळे भविष्यकाळात महाराष्ट्र उद्योगप्रिय राज्यांच्या क्रमवारीत निश्चित प्रथम स्थान प्राप्त करू शकेल, असा विश्वास आहे. परंतु हे यशोशिखर गाठण्याकरिता गरज आहे ती नोकरशाहीची मानसिकता बदलण्याची. कारण उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे हे काही एकट्यादुकट्या व्यक्तीचे काम नाही, तर ती एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत सहभागी प्रत्येक घटकाने अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून याचा विचार करायला हवा.
उद्योग आणि उद्योजकांसाठी सुकर परिस्थिती आपल्या राज्यातही निर्माण होऊ शकते. गरज आहे ती केवळ अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीची. बहुतांश अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता आणि अधिकारशाही उद्योगांच्या प्रगतीतील अडसर ठरत आहे. त्यामुळे उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. साधा इमारतीचा नकाशा मंजूर करून घ्यायलाही अडथळ्यांची शर्यत पूर्ण करावी लागते. गेल्या १५ ते २० वर्षांपासून या विभागांमध्ये अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराची दलदल निर्माण झाली आहे. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणे ही दलदलही साफ करण्याची आवश्यकता आहे. बरेचदा उद्योग सुरू करण्यास इच्छुक लोक कुठलाही धोका पत्करायला तयार नसतात. प्रत्येक गोष्ट आपोआप मिळणार नाही. त्यासाठी कठोर परिश्रमांची गरज असते. प्रामुख्याने स्टार्टअप्ससाठी दर्जेदार सेवा प्राधान्यक्रमावर असणे गरजेचे आहे. संकल्पना, अंमलबजावणीची क्षमता, आवड व निर्धार असल्यास या जगात अशक्य काहीच नाही.