" चिमणराव " भूमिकेने एक चेहरा दिला : दिलीप प्रभावळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 01:25 PM2020-04-06T13:25:06+5:302020-04-06T13:25:32+5:30

पण महाराष्ट्राबाहेरची लोक मला आजही '' चिमणराव '' म्हणूनच ओळखतात.

The role of "Chimanrao" gave a face: Dilip Prabhalakar | " चिमणराव " भूमिकेने एक चेहरा दिला : दिलीप प्रभावळकर

" चिमणराव " भूमिकेने एक चेहरा दिला : दिलीप प्रभावळकर

googlenewsNext
ठळक मुद्देचिमणराव आणि गुंड्याभाऊ या मालिकेच्या माध्यमातून कायमची अजरामर

ए काऊ....ए काऊ अशा विशिष्ट आवाजात बायकोला हाक  मारणारे चिमणराव....आणि  चिमणरावांना पदोपदी सांभाळून घेणारे  गुंड्याभाऊ. ही दोन पात्रे टेलिव्हिजन जगतात चिमणराव आणि गुंड्याभाऊ या मालिकेच्या माध्यमातून कायमची अजरामर झाली. प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक उर्फ चिं.वि जोशी यांच्या चिमणराव व गुंडयाभाऊ या अत्यंत गाजलेल्या कथांवर आधारित या मालिकेने केवळ मराठीचं नव्हे तर अमराठी रसिकांच्या मनावर देखील अधिराज्य गाजवले. आता ही मालिका कोरोना संचारबंदीच्या काळात घरी बसलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी दूरदर्शनवर पुन:प्रसारित केली जात आहे...या मालिकेच्या स्मरणरंजनाचा कप्पा  ''चिमणराव उर्फ ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर'' यांनी  '' लोकमत ''शी बोलताना उलगडला...

चिमणराव साकारणं हा अत्यंत आनंदायी अनुभव होता. आजही मला अमराठी लोक चिमणराव नावानंच ओळखतात. चिमणराव भूमिकेनं मला एक  चेहरा दिला. मी घराघरात पोहोचलो. हे पात्र कॉमन मॅन सारखचं प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी बिंबलं गेलं. पण मी त्या प्रतिमेत स्वत:ला अडकून घेतलं नाही, अशी भावना प्रभावळकर यांनी व्यक्त केली.
--------------------------------------------------------------------------
नम्रता फडणीस- 


* '' चिमणराव '' ही भूमिका तुमच्याकडे कशी आली?
- मी एक गजरा नावाचा कार्यक्रम करायचो. त्यामध्ये स्वत: लेखन करून प्रहसन करायचो. विनायक  चासकर हे या कार्यक्रमाचे  निर्माते - दिग्दर्शक होते. त्यामध्ये पंचवीस एके पंचवीस नावाच्या प्रहसनात्मक लेखनात मी एकाच जोडप्याच्या तीन अवस्था दाखविल्या होत्या. त्याच्या पहिल्या भागात सुमार वकूब असणारं पात्र होतं. जे अत्यंत सामान्य होतं. पत्नीवर इम्प्रेशन पाडण्यासाठी तो खूप काही सांगत असतो आणि पत्नी ते भाबडेपणाने ऐकत असते .थोडक्यात महत्वाची व्यक्ती नसतानाही ती असल्याचा आव आणत असते.त्या व्यक्तिरेखेत एक निरागस भाव होता. ती माझी भूमिका बघून विजया जोगळेकर यांनी मला चिमणराव आणि गुंड्याभाऊ ही मालिका करायचा विचार करतोय. त्यामध्ये तुम्ही ''चिमणराव साकाराल का? असं मला विचारलं. पण मी स्वत:च्या डोळ्यासमोर चिमणराव म्हणून कधीच आलो नाही. बहुतेक आर.के लक्ष्मण यांच्यासारख्या कॉमन मँन सारखा तो '' कॉमन '' हवा होता. माझ्या भूमिकेला अपेक्षेपेक्षाही लोकांना अधिक पसंत केले. विशेषत: अमराठी लोकांना यात काय गवसलं हे न उलगडणारं कोड आहे.
* दूरदर्शनवर त्या काळात पहिल्यावहिल्या मालिकेद्वारे झळकण्याचा अनुभव कसा होता?
-त्याकाळात एकच दूरचित्रवाहिनी होती ती म्हणजे  दूरदर्शन. कुणाशी स्पर्धा अशी काही नव्हती. त्यातून चिमणराव आणि गुंड्याभाऊ ही पहिलीच मालिका होती. त्यामुळं आमचं कौतुक जरा जास्त होतं. लोकांना खूप कुतुहलहोतं. आजपर्यंत इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. पण महाराष्ट्राबाहेरची लोक मला आजही '' चिमणराव '' म्हणूनच ओळखतात. मी काय किंवा गुंड्याभाऊ म्हणजे बाळ कर्वे काय, आम्ही पहिले टीव्ही स्टार होतेअसे म्हणता येईल.
* ही मालिका प्रेक्षकांच्या इतक्या पसंतीस उतरण्यामागची तुमची निरीक्षणं कोणती?
- या मालिकेचा काळ हा साधारणपणे 1940 च्या आसपासचा आहे. टिपिकल सदाशिवपेठी कुटुंब. मोरू ला पण मोरया,  मैना, कावेरीला ''काऊ'' म्हणणं हा मराठीमधला साधेपणा आणि त्यातील विनोद लोकांना कदाचित आवडला असेल.मालिकेद्वारे आम्हाला मिळालेली लोकप्रियता अनपेक्षित अशीच होती. कुणालाखरं वाटणार नाही पण ही मालिका महिन्यातून एकदा प्रसारित व्हायची.त्यावेळी घरोघरी टिव्ही संचही नव्हते. लोक नंबर लावून कुणाच्या ना कुणाच्या घरी मालिका पाहायला जायचे. हे आजही आठवते
 

* इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा ही मालिका पुन:प्रसारित केली जात आहे?. त्याविषयी काय वाटतं?
-  एक अभिनेता म्हणून असं वाटत की त्यावेळची जी जादू होती, एकच वृत्तवाहिनी, पहिलीच मालिका, कृष्णधवलचा काळ, घरेलू मालिका. आत्ताच्याकाळात ही मालिका काहीशी आऊटडेटेड झाल्यासारखी वाटेल की काय किंवा ती जुनाटपणाची वाटेल का? आता ही मालिका बघून कदाचित हसू देखील येऊ शकतं. त्याचा साधेपणा अजूनलोकांना अपील होईल का? पण लोकांनी या सर्व शक्यता खोट्या ठरवल्या आणि प्रेक्षक स्मरणरंजनात रमले आहेत. चिं.वि जोशी यांचे साहित्य हे टिकणारे साहित्य आहे.त्यामुळे त्या साहित्यावर आधारित मालिका देखील टिकायला हरकत नाही.
 

* दूरचित्रवाहिन्यांनी वाचनसंस्कृती संस्कृती मारली आहे असं नेहमी म्हटलं जातं. तुमचं त्याविषयीचं मत काय?
- चिं.वि जोशी यांची  जेव्हा ही मालिका सुरू होती. त्यावेळी  सर्व त्यांच्या सर्व पुस्तकांच्या आवृत्या संपल्या होत्या. दुसरा अनुभव म्हणजे माझ्या अनुदिनी पुस्तकावर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ही मालिका निर्मित केली. त्यानंतर उत्कर्ष प्रकाशनच्या सु.वा जोशी यांनी अनुदिनी अर्थात श्रीयुत गंगाधर टिपरे असे नाव आवृत्यांना दिल्यानंतर पुस्तकाचा खूप अचानक वाढला. दूरचित्रवाहिन्यांचा पुस्तक खपण्यावरही परिणाम होऊ शकतो ही याची उदाहरणं आहेत.
 

* चिं.वि जोशी यांच्या लेखनाकडे एक लेखक म्हणून कसं पाहता? त्यांच्या लेखनाची सौंदर्यस्थळं कोणती जाणवतात?
-चिं.वि जोशी यांचे लेखन हे पटकथा आणि संवादाला पोषक असं आहे. त्यामुळे मालिका करताना फार अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतलं नाही. त्यांचा निर्मिष प्रकारातला विनोद आहे. आपल्याकडे विनोद चिं.वि जोशी यांनी आणला. आचार्य अत्रे चिं.वि जोशी यांना ' कोमल विनोदाचे फुलमाळी ' म्हणायचे. कोमल विनोदाचा अभिनयाविष्कार सादर करण्याची मला संधी मिळाली.
 

*  ‘ चिमणराव’ ची प्रतिमा तोडण्यासाठी काही संघर्ष करावा लागला का?
- हो नक्कीच! चिमणरावनंतर त्याच त्याच भूमिकांच्या ऑफर यायल्या लागल्या होत्या. मी तशाच भूमिका वारंवार करून पैसा कमवू शकलो असतो. पण मी जाणीवपूर्वक ही प्रतिमा तोडली. हट्टाने वेगळ्या भूमिका केल्या आणि नाटकानेच ते शक्य झाले.  वासूची सासू; पुलं चं  एक झुंज वा-याशी आणि जयवंत दळवी यांचं  नातीगोती मधील मतिमंद मुलाची भूमिका लोकांनी स्वीकारल्या. त्यामुळे  ‘चिमणराव’ ची प्रतिमा पुसली गेली. एकच भूमिका पुन्हा पुन्हा न करणं टाळलं.
* एकविसाव्या शतकात '' चिमणराव आणि गुंड्याभाऊ '' ही मालिका नव्या संचात आणणं शक्य होईल का? काय वाटतं?
- काळ तोच ठेवला आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला तर ती नक्कीच रंजक होईल. कारण चिं.वि जोशी यांचा विनोद हा काळाच्या ओघात टिकणारा आहे. त्यामुळे नक्कीच नव्या संचात ही मालिका करता येऊ शकेल.
------------------------------------------------------------------------------------

Web Title: The role of "Chimanrao" gave a face: Dilip Prabhalakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.