अर्ज भरताच मांडणार वादग्रस्त मुद्द्यांवर भूमिका

By admin | Published: September 24, 2016 03:16 AM2016-09-24T03:16:21+5:302016-09-24T03:16:21+5:30

मराठा आरक्षणाचा विषय, त्यावरील माझी भूमिका मी अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरल्यावर जाहीर करणार आहे

Role of controversial issues that will be filled in the application | अर्ज भरताच मांडणार वादग्रस्त मुद्द्यांवर भूमिका

अर्ज भरताच मांडणार वादग्रस्त मुद्द्यांवर भूमिका

Next


डोंबिवली : स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा असो किंवा मराठा आरक्षणाचा विषय, त्यावरील माझी भूमिका मी अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरल्यावर जाहीर करणार आहे, असे समीक्षक अक्षयकुमार काळे यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केले. कोणती उद्दिष्टे समोर ठेवून आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, असे विचारल्यावर त्यांनी हे स्पष्ट केले.
संमेलनाध्यक्षाच्या उमेदवारांकडून साहित्यातील विविध प्रवाह, साहित्यमूल्ये याबाबत त्यांची भूमिका जशी अपेक्षित असते, दिशादर्शन अपेक्षित असते, तशीच अपेक्षा असते विविध सामाजिक प्रश्नांवरील भूमिका स्पष्ट करण्याची. विदर्भ स्वतंत्र करण्याचा विषय आणि मराठा समाजातर्फे भावना व्यक्त करण्यासाठी सुरू असलेले मूक मोर्चे याबाबत अध्यक्षपदाच्या या उमेदवारांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याबाबत साहित्यवर्तुळात उत्सुकता आहे.
साहित्य महामंडळाचे कार्यालय विदर्भात गेल्यापासून पुणे आणि नागपूर असा संघर्ष पाहायला मिळतो. त्याचे प्रत्यंतर संमेलनाचे स्थळ जाहीर करताना आले. यंदाचे संमेलनस्थळ असलेले डोंबिवली हे पुणे शाखेच्या कार्यक्षेत्रांतर्गत येते. पुण्यातर्फे गणेश देवी आणि रावसाहेब कसबे यांची तर विदर्भाकडून अक्षयकुमार काळे आणि रवींद्र शोभणे यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीपासून संमेलन संस्थेवरील प्रभावापर्यंत अनेक बाबतीत हा ताण दिसेल, असे मानले जाते. (विशेष प्रतिनिधी)
>अक्षयकुमार काळे यांची भिस्त विदर्भावर
एकगठ्ठा मतदानासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भ साहित्य संघावर अध्यक्षपदाचे उमेदवार अक्षयकुमार काळे यांची भिस्त असल्याचे सांगितले जाते. विदर्भाच्या भूमिकेवरच मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ यांची भूमिका ठरते. त्यामुळे तेथील मते बडोदा, आंध्र प्रदेश, पुणे-मुंबईतील प्राध्यापक मंडळी आणि काही माजी संमेलनाध्यक्ष, त्यांच्या समीक्षेचे रसिक यांचे मतदान त्यांना होईल, असे मानले जाते. चर्चेतील अन्य उमेदवार गणेश देवी आणि राबसाहेब कसबे यांना निवडणूक लढवण्यात रस नाही. बिनविरोध निवड व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे, तर ज्येष्ठ समीक्षक म.सु. पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अजून अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता दाखवलेली नाही.
>ते महामंडळाचे कार्यक्षेत्र
साहित्य संमेलनाच्या स्थळाची निवड करताना समितीने डोंबिवली, कल्याण, बेळगावला भेट दिली होती. त्यातील डोंबिवलीची निवड झाली.
त्यामुळे नाराज झालेल्या कल्याणच्या आयोजक संस्थेने संमेलनस्थळ निवडीत पारदर्शकता हवी, असे मत मांडले होते. त्याचे निकष स्पष्ट हवेत, अशीही त्यांची मागणी आहे.
त्याबाबत, विचारता काळे म्हणाले, हा प्रश्न महामंडळ, अध्यक्ष, पदाधिकारी, संमेलनस्थळाची पाहणी करणारी समिती यांच्याशी निगडित आहे. त्याबाबत त्यांनीच भूमिका व्यक्त करणे सयुक्तिक ठरेल.
>संमेलनाला वाद चिकटलेलेच; वादांशिवाय संमेलन कसे?
राजकारण्यांना एवढी नावे ठेवता, तर मग तुम्ही एक तरी साहित्य संमेलन वादाशिवाय घेऊन दाखवा, अशी मार्मिक टीका करून माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी साहित्यिकांची नाराजी ओढवून घेतली होती. संमेलनस्थळ ठरवण्याच्या आणि ते जाहीर करण्यापासूनच डोंबिवलीचे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यापूर्वी मुंबईत झालेल्या साहित्य संमेलनाला बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बैलबाजारा’ची उपमा दिल्याने वाद उफाळला होता. तर, नथुराम गोडसे यांच्या गौरवास्पद उल्लेखाने ठाण्याच्या संमेलनात स्मरणिका जाळण्यात आल्या होत्या. सहिष्णुतेच्या वादात आनंद यादव यांचे अध्यक्षपद गेल्याने महाबळेश्वरचे साहित्य संमेलन अध्यक्षांविना पार पडले होते. चिपळूणच्या संमेलनावेळी निमंत्रणपत्रिकेवर परशू छापण्याचा वाद गाजला होता. बेळगावच्या संमेलनात ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावरील निर्बंधांचा वाद गाजला होता. गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवडला पार पडलेल्या साहित्य संमेलनापूर्वी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करण्यावरून वाद निर्माण झाला होता आणि संमेलन होऊ न देण्यापर्यंतचे इशारे देईपर्यंत मजल गेली होती.

Web Title: Role of controversial issues that will be filled in the application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.