‘एकला चलो’ची भूमिका, मत विभाजनाचा धोका
By admin | Published: February 20, 2017 09:02 PM2017-02-20T21:02:43+5:302017-02-20T21:02:43+5:30
‘एकला चलो’ची भूमिका, मत विभाजनाचा धोका
अमरावती : मतदानाला काही तास उरले असताना बहुतेक गण-गटांमध्ये मात्र वेगळेच चित्र अनुभवाला येत आहे. आतापर्यंत सोबतीने पक्षासाठी मतदान मागणारे उमेदवार अंतिम वाटेत ‘एकला चलो’ या भूमिकेत आले आहे. एकेका मतासाठी संघर्ष अटळ असल्याने जुगाड तंत्राचा वापर सुरू झाला असल्याने मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंगची भीती निर्माण झाली आहे. यामुळे मतमोजणीअंती अनपेक्षित चित्र अनुभवास येणार आहे.
जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीच्या ८८ गणांसाठी मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. मतदानापूर्वीच्या अंतिम काही तासांत मात्र वेगळेच चित्र अनुभवायला येत आहेत. यापूर्वी प्रचारात एकत्रपणे फिरून पक्षासाठी मते मागणारे उमेदवार मात्र आता एक मत द्या, बाकी तुम्ही ठरवा. या मार्गाचा खुला अवलंब करताना दिसत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुती व आघाडी यांची ताटातूट झाल्यानंतर सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे गण-गटांतील राजकीय पक्षांचे उमेदवार एकत्रितपणे फिरून प्रचार करताना आढळून येत आहेत. मात्र रविवारी प्रचाराचा अंतिम धमाका झाल्यावर अनेक उमेदवारांनी छुप्या तंत्राचा वापर करीत ‘एकला चलो रे’ ही भूमिका घेतली.
यासाठी प्रसंगी अन्य उमेदवारांचे साहाय्यदेखील घेण्यात येत आहे, तर कुठे जातीय समीकरणांचा आधार घेतला जाऊन एका मतासाठी जोगवा मागितला जात असल्याचे अंतिम क्षणातील चित्र आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन उमेदवारांमध्येदेखील अविश्वास खदखदत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
मनीपॉवर ठरतोय प्रभावी
गण-गटातील एकाच पक्षाचे उमेदवारांची आर्थिक कुवत मात्र सारखी नाही. त्यामुळे एकाच्या खर्चाचा भार दुसऱ्या उमेदवारांना सहन करावा लागतो. आतापर्यंत एकत्र फिरून मत मागणारे उमेदवार प्रचाराच्या अंतिम क्षणात मात्र सहकाऱ्याचा हात सोडताना दिसत आहे. किती दिवस खर्चाचा भार सोसायचा त्यापेक्षा स्वत: खर्च करून स्वत:साठी एक मागण्याकडे उमेदवारांचा कल दिसून येत आहे.