‘मेट्रो’बाबत सरकारची भूमिका आकसाची
By admin | Published: January 23, 2015 12:16 AM2015-01-23T00:16:19+5:302015-01-23T00:16:19+5:30
भाजपा सरकारची पुण्याबाबत आकसाची भावना दाखवित असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली.
पुणे : नागपूर आणि पुणे मेट्रोचा प्रस्ताव एकाच दिवशी केंद्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारच्या केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने या दोन्ही मेट्रोला मंजुरी दिली असताना, केवळ नागपूरचे नेते किती कार्यक्षम आहेत, हे दाखविण्यासाठी जाणूनबुजून केवळ नागपूर मेट्रोचेच उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे भाजपा सरकारची पुण्याबाबत आकसाची भावना दाखवित असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली.
चव्हाण म्हणाले की, राज्यातील लोकसंख्येनुसार, मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे असा मेट्रो प्रकल्पांचा क्रम ठरविण्यात आला होता. त्यानुसार पुणे मेट्रोच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर, नागपूर आणि पुणे मेट्रोचे प्रस्ताव ७ फेब्रुवारी २०१४ ला स्वतंत्र अधिकारी पाठवून केंद्राकडे पाठविण्यात आले.
केंद्रीय नगरविकास विभागाने त्यास मान्यताही दिली. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्यानंतर जाणूनबुजून निविदा प्रक्रिया राबविण्याच्या आधी नागपूर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले आणि पुणे मेट्रो मागे पडली.
प्रत्यक्षात दोन्ही मेट्रोचे एकाच वेळी उद्घाटन का झाले नाही, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच, नागपूर मेट्रोचे उद्घाटन करताना पुणे मुद्दाम मागे ठेवण्यात आले असून, नागपूरचे नेते हे कार्यक्षम असल्याचे दाखविण्यासाठी पुण्याबाबत आकसाची भावना ठेवली जात असल्याची टीका चव्हाण यांनी या वेळी केली. (प्रतिनिधी)
‘एसपीव्ही’ची
स्थापना का नाही ?
४‘एसपीव्ही’ची स्थापना न झाल्याने, ‘पुणे मेट्रो’ रखडली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आघाडी सरकारने ‘एसपीव्ही’ स्थापण्याची कार्यवाही पूर्ण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ती मागे पडली. मात्र, आता भाजपाने सत्तेत आल्यानंतर, नवा वाद काढून, ती स्थापण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हा प्रकल्प रखडला असल्याचेही ते म्हणाले.