एमआयएम ‘शो स्टॉपर’च्या भूमिकेत
By Admin | Published: January 17, 2017 02:53 AM2017-01-17T02:53:33+5:302017-01-17T02:53:33+5:30
आपल्यापैकी अनेकांना ‘शो मस्ट गो आॅन...’ ही संकल्पना माहीत असेलही;
महेश चेमटे,
मुंबई- आपल्यापैकी अनेकांना ‘शो मस्ट गो आॅन...’ ही संकल्पना माहीत असेलही; मात्र सुरू असलेल्या ‘शो’ला एका निर्णयाक भूमिकेवर आणून ठेवणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा राजकीय पक्षही असतात; आणि ते ‘शो स्टॉपर’ म्हणून ओळखले जातात. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘एमआयएम’ हा पक्ष ‘एल’ वॉर्डात आता ‘शो स्टॉपर’ची भूमिका वठवणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएम लक्षवेधी कामगिरी करू शकणार नसला तरी निर्णायक कामगिरी नक्कीच करू शकेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.
सर्वात श्रीमंत महापालिकेत ‘नगरसेवक’ म्हणून विराजमान होण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. परिणामी मोठ्या पक्षांपुढे ‘कार्यकर्ते कमी आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक जास्त’ असा पेच उभा राहिला आहे. विशेष म्हणजे फेररचनेचा सर्वाधिक फटका बसलेल्या एल वॉर्डात तर ही समस्या बड्या नेत्यांना भेडसावत आहे. मुळात एल वॉर्ड हा विस्ताराने मोठा असल्याने तेथे झालेल्या फेररचनेमुळे कार्यकर्त्याला नेता झाल्याचे स्वप्न पडत आहे. १६ प्रभाग असलेल्या या वॉर्डात सुमारे ९ लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. आरक्षणामुळे पक्षातील जुने नगरसेवक नव्याने सज्ज आहेत.
हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीय अशी मिश्र लोकवस्ती विविध प्रभागांत विखुरलेली असल्याने इच्छुकांची मने सांभाळताना सर्वच पक्षांची दमछाक होत आहे. त्यातच विद्यमान नगरसेवक आपल्या परिचितांसाठी तिकिटांची मागणी करत आहे. परिणामी विद्यमानांवर विश्वास ठेवायचा का नव्या दमाला संधी द्यायची, हा प्रश्न एल वॉर्डातील बहुतांशी प्रभागात आहे. मध्यमवर्गीय मराठी लोकवस्तीचा कल शिवसेनेकडे, मुस्लीम लोकवस्तीचा काँग्रेस, सपाकडे असल्याचे स्थानिक जाणकारांनी सांगितले. ठरावीक प्रभाग वगळता मनसे, भाजपा, राष्ट्रवादीला यश मिळवण्यासाठी प्रयत्नांनी पराकाष्ठा करावी लागणार आहे. शिवाय एमआयएम पक्षाच्या कक्षा कुर्ला परिसरात रुंदावल्याने हा पक्ष एल वॉर्डात ‘शो स्टॉपर’ची भूमिका बजावू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
>‘एल’ वॉर्डमध्ये कसाईवाडा, कुर्ला पाइपलाइन रोड, जरीमरी, कुर्ला पश्चिमेकडील ब्राह्मणवाडी, आझादनगर, भाभा रुग्णालयाचा काही परिसर, कुरेशीनगर आणि पान बाजार या परिसरात मुस्लीम बांधवांची वस्ती आहे. काही दिवसांपूर्वीच एमआयएमने येथे सभा घेत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. अद्याप एमआयएमची येथे एक सभा झाली असून, महापालिकेच्या निवडणुकीला महिना आहे. परिणामी येथील मते आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी एमआयएम काय खेळी खेळणार, हे पाहणेही तेवढेच औत्सुक्याचे ठरणार आहे.
>‘फॉरवर्ड’चा वेग वाढला
आचारसंहितेमुळे ‘चमकोगिरी’ला लगाम लागला तरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. प्रभागावर आपली पकड, प्रभागात केलेली कामे यांचे उठावदार संदेश, फोटो त्या त्या पक्षातील बड्या नेत्यांनादेखील ‘फॉरवर्ड’ होत आहेत.