रुळाला तडा गेल्याने अपघात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2016 01:24 AM2016-12-30T01:24:54+5:302016-12-30T01:24:54+5:30

विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान कुर्ला-अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरून घसरल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Rolle collapse? | रुळाला तडा गेल्याने अपघात?

रुळाला तडा गेल्याने अपघात?

Next

मुंबई : विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान कुर्ला-अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरून घसरल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घडलेल्या घटनेमुळे मध्य रेल्वेचा पुरता बोऱ्या वाजला. घटनेची तीव्रता पाहिल्यास, अपघात खूपच मोठा असल्याचे लक्षात येते.
रुळाला तडा गेल्यानेच अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रुळाला तडा गेल्याने एवढा मोठा अपघात होऊ शकतो, तर २0१४ पासून आतापर्यंत रुळाला तडा गेल्याच्या घटना पाहिल्यास, २६0 घटना घडल्याची माहिती नुकतीच माहिती अधिकारात उघड झाली होती.
सातत्याने रुळांना तडा जात असल्याच्या घटना घडत असल्याने, मध्य रेल्वे त्या गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे लोकल प्रवाशांचा प्रवास ‘धोकादायक’ट्रॅकवर तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्य रेल्वे मार्गावर पहाटे घडलेल्या घटनेमुळे लोकल फेऱ्या आणि मेल-एक्स्प्रेस सेवांवर मोठा परिणाम झाला. जवळपास १६३ लोकल फेऱ्या रद्द करतानाच, १00 हून अधिक फेऱ्या उशिराने धावल्या.
प्रवाशांना कोणत्याही मनस्तापाला सामोरे जावे लागता कामा नये, यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष लोकल फेऱ्यांची सोयही करण्यात आली. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या दरम्यान २६, तर सीएसटी ते कल्याण दरम्यान ४0 विशेष फेऱ्या सोडण्यात आल्या.
महत्त्वाची बाब म्हणजे, या घटनेमुळे मेल-एक्स्प्रेस सेवांवरही मोठा परिणाम झाला. विशेष करून, मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या ट्रेनच रद्द करण्यात आल्या. यामध्ये सीएसटी-पुणे-सीएसटी डेक्कन क्वीन, सीएसटी-पुणे-सीएसटी इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. (प्रतिनिधी)

डाउन मेल-एक्स्प्रेसवर परिणाम
सीएसटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस, सीएसटी ते पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सीएसटी-केएसआर बंगळुरू एक्स्प्रेस, उदयन एक्स्प्रेस, सीएसटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, एलटीटी-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस, सीएसटी-नागरकोईल एक्स्प्रेस, सीएसटी-हैद्राबाद एक्स्प्रेस, सीएसटी-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, सीएसटी-चैन्नई सेन्ट्रल एक्स्प्रेस, सीएसटी-चैन्नई एसी विशेष ट्रेन या डाउनला जाणाऱ्या ठाणे, दिवा, पनवेल, कर्जतमार्गे वळवण्यात आल्या.

अप मेल-एक्स्प्रेसवर परिणाम
कोल्हापूर-सीएसटी सह्याद्री एक्स्प्रेस, पुणे-सीएसटी सिंहगड एक्स्प्रेस, कोल्हापूर-सीएसटी महालक्ष्मी एक्स्प्रेस, काकीनाडा पोर्ट-एलटीटी एक्स्प्रेस, हैद्राबाद-सीएसटी एक्स्प्रेस, चैन्नई सेन्ट्रल-सीएसटी एक्स्प्रेस, कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेसही कर्जत, पनवेल, दिवा, ठाणेमार्गे वळवण्यात आल्या.

- या घटनेनंतर जवळपास १४ मीटरपर्यंत रूळ उखडून त्यांचे तुकडे झाले होते. ही घटना रुळाला तडा गेल्यानेच घडल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. २२ नोव्हेंबर रोजी या मार्गावरील सुरक्षा पाहणी करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. अपघात ज्या ठिकाणी घडला, त्या ठिकाणी रुळांच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यानेच अपघाताला निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

२0१६ मध्ये मध्य रेल्वेवर ट्रेन घसरल्याच्या घटना
५ फेब्रुवारी : सीएसटीजवळ एका मालगाडीचा एक डबा रुळावरून घसरला. यामुळे हार्बर मार्गावरील सेवांवर परिणाम झाला व ५0 फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
१ मे : अमन लॉजजवळ मिनी ट्रेनचा डबा रुळावरून घसरला. यात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले.
८ मे : माथेरानमधील अमन लॉजजवळ पुन्हा एकदा मिनी ट्रेनचा डबा रुळावरून घसरला. प्रवासी बालंबाल बचावले.
१ आॅगस्ट : कल्याण-सीएसटी लोकलचे दोन डबे कल्याण स्टेशनजवळ घसरले. यामुळे ६0 लोकल फेऱ्या रद्द झाल्या.
७ जुलै : सीएसटी-बेंगलोर उदयन एक्स्प्रेसचे इंजिन सीएसटी स्थानकाजवळ घसरले. यामुळे ७0 लोकल फेऱ्या रद्द
झाल्या होत्या.

Web Title: Rolle collapse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.