'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायद्यात'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 01:05 AM2019-11-21T01:05:23+5:302019-11-21T06:30:50+5:30
कायदे रद्द झाल्यास देश बलशाली होणार असल्याचा दावा
मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायदे असून, शेतकरीविरोधी कायदे रद्द केल्याशिवाय शेतकºयांच्या कल्याणाच्या योजना परिणामकारक ठरू शकत नाहीत, असे मत किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी मांडले आहे. महत्त्वाचे म्हणजे शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे हा देश बलशाली करण्याचा कार्यक्रम आहे, असेही हबीब म्हणाले आहेत.
किसानपुत्र आंदोलनच्या ७व्या राज्यस्तरीय शिबिराच्या अर्थात, किसानपुत्र कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीच्या पार्श्वभूमीवर अमर हबीब यांनी सांगितले, पुण्यातील डोणजे येथील वाडा फार्म हाउस येथे हे शिबिर होईल. आपल्या देशात कायद्यांनी व्यवस्था निर्माण केली आहे. गॅट करारावर सही करून आपल्या सरकारने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले, पण शेती क्षेत्रात उदारीकरण येऊ दिले नाही. सिलिंग, आवश्यक वस्तू व अधिग्रहण हे उदारीकरण विरोधी तीन कायदे तसेच ठेवले. परिणामी, शिबिरात किसानपुत्र आंदोलनावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
२३ नोव्हेंबर रोजीचे विषय
निवडणुकीत किसानपुत्रांची भूमिका निर्णायक का ठरत नाही? आंदोलनाचे बदलते स्वरूप व काल सुसंगत आंदोलनाची दिशा, न्यायालयीन लढाई पुढे नेण्यासाठी आणखी काय करणे आवश्यक आहे? आवश्यक वस्तू कायदा वर्षभराच्या आत रद्द करून घेण्यासाठी नेमके काय करावे लागेल? आगामी वाटचालीसाठी संघटनात्मक बांधणी आवश्यक आहे का? तिचे स्वरूप कसे असावे?
२४ नोव्हेंबर रोजीचे विषय
वार्षिक कार्यक्रम, शहरी भागांत विस्तार करण्यासाठी आणखी काय उपाय करता येतील? महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काय प्रयत्न करता येईल? महाराष्ट्रातील किसानपुत्र कायदे रद्द करण्यासाठी काय जबाबदारी घेऊ शकतात, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
हे शेतकरीविरोधी कायदे रद्द करा
कमाल शेतजमीन धारणा कायदा (सिलिंग)
आवश्यक वस्तूंचा कायदा
जमीन अधिग्रहण कायदा