गोवारीकरांच्या जडणघडणीची मुळे कोल्हापुरात

By Admin | Published: January 3, 2015 01:24 AM2015-01-03T01:24:29+5:302015-01-03T01:24:29+5:30

ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांच्या जन्म पुण्याचा असला तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे अंकुर फुलले ते कोल्हापूरनगरीत.

The roots of Gowarikar's struggle in Kolhapur | गोवारीकरांच्या जडणघडणीची मुळे कोल्हापुरात

गोवारीकरांच्या जडणघडणीची मुळे कोल्हापुरात

googlenewsNext

कोल्हापूर : ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांच्या जन्म पुण्याचा असला तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे अंकुर फुलले ते कोल्हापूरनगरीत. प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरात घेतलेल्यानंतर ते संशोधनासाठी परदेशात गेले. शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कीर्ती जगाच्या पातळीवर विस्तारत गेली असली तरी त्यांच्या या जडणघडणीची मुळे कोल्हापूरच्या मातीत घट्ट रोवली गेली. पुढे विज्ञान क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल शिवाजी विद्यापीठाने त्यांना २२ नोव्हेंबर १९८७ रोजी ‘डॉक्टर आॅफ सायन्स’ ही पदवी प्रदान करून हे ऋणानुबंध अधिक गहिरे केले.
गोवारीकर हे कुटुंबच मूळचे कोल्हापूरचे. वडील रणछोड यांचा पूर्वी बिंदू चौकात फोटो स्टुडिओ होता. ‘गोवारीकर लकी फोटो’ अशी जाहिरातही त्यावेळी वृत्तपत्र व मासिकांतून छापून यायची. पुढे ते सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता होते. डॉ. वसंत यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी पुण्यात झाला़ पण महाविद्यालयीन शिक्षण होईपर्यंत ते कोल्हापुरात वास्तव्यास होते. काही वर्षे हरिहर विद्यालयामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. विद्यापीठ हायस्कूल आणि त्यानंतर महाविद्यालयीन म्हणजे बी.एस्सी.चे शिक्षण राजाराम कॉलेजमध्ये झाले. सरकारने चरखा मॉडेलच्या घेतलेल्या स्पर्धांसाठी लांब आणि पीळदार सूत काढणारा चरखा विद्यार्थीदशेतच त्यांनी बनवला होता. हा ‘वसंत चरखा’ म्हणजे त्यांच्या विज्ञानप्रतिभेचा पहिला राष्ट्रीय आविष्कार. येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कागलच्या शाळेत त्यांनी काही काळ अध्यापनाचे काम केले. पुढे रत्नागिरीच्या गोगटे कॉलेज आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरी करत त्यांनी एम. एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर ते संशोधनासाठी परदेशात गेले.
वसंत, अशोक व मीलन गोवारीकर हे तिघे भाऊ. मीलन हे कोल्हापुरातील नागाळा पार्क येथे बरीच वर्षे वास्तव्यास होते, तसेच दुसरे बंधू म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचे वडील अशोक यांचेही या शहराशी जिव्हाळ््याचे नाते आहे. कोल्हापुरातील एस. टी. स्टँड परिसरातील महालक्ष्मी चेंबर्सजवळील इमारत ही मीलन गोवारीकर यांचीच. वसंतरावांच्या अवकाशविषयक आणि अग्निबाणविषयक मौलिक संशोधनकार्याचा गौरव देशाच्या विविध भागांतून झाला आहे. विज्ञान क्षेत्रातल्या वस्तुनिष्ठ वातावरणात राहूनही त्यांची जीवनाबद्दलची ओढ आणि समाजाबद्दलचा ओलावा कायम होता.
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने विचारवंत, राजकीय तज्ज्ञ, साहित्यिक, संगीत कलावंत, चरित्रकार, समाजसुधारक , शिक्षणतज्ज्ञांचा डी.लिट्. देऊन सन्मान केला जातो. मात्र, अवकाश शास्त्रात असामान्य कर्तृत्व गाजविणाऱ्या कोल्हापूरच्याच भूमीतल्या गोवारीकरांचा विद्यापीठाने ‘डॉक्टर आॅफ सायन्स’ (डी.एस्सी) ही पदवी देऊन गौरव केला. ही पदवी प्रदान करताना विज्ञान शाखेचे प्रमुख डॉ. आप्पासाहेब वरुटे यांनी गौरवपत्र वाचले होते. त्यानंतर ही पदवी कोणालाही दिली गेली नाही. आपली जडणघडण ज्या कोल्हापुरात झाली त्या शहराशी असलेले ऋणानुबंध वसंतरावांनी जपले. विज्ञान प्रबोधिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी ‘हवामान बदलाचा अभ्यास’ या विषयावर व्याख्यान दिले होते. दोन वर्षांपूर्वी अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलला त्यांनी भेट दिली होती. हा त्यांचा अखेरचा कोल्हापूर दौरा ठरला.

आपल्या संशोधनाचा उपयोग तळागाळातील समाजासाठी झाला पाहिजे, अशी डॉ. वसंत गोवारीकर यांची इच्छा होती. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष असतानाही त्यांनी कुटुंब असल्याप्रमाणे ही संस्था सांभाळली. स्वच्छतागृहांसाठी सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर कसा होऊ शकतो, याबद्दल ते नेहमी चर्चा करीत असत.
- डॉ. विजय भटकर,
ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ
भारताचा अवकाश संशोधन कार्यक्रम डॉ. वसंत गोवारीकर यांनीच सुरू केला. त्यांच्या कार्यातून नेहमीच त्यांच्या सहकाऱ्यांना प्रेरणा मिळत असे. आपण २०१४ हे वर्ष देशासाठी वैज्ञानिकदृष्ट्या खूप नशीबवान म्हणत असलो तरी त्याचा पाया डॉ. गोवारीकर यांनी रचला आहे. परदेशातील लोकांनी तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या उपकरणांना नकार दिल्यावर डॉ. गोवारीकर यांनी स्वत: पुढाकार घेऊन सर्व तंत्रज्ञान देशातच विकसित केले.
- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

वसंत गोवारीकर यांनी विक्रम साराभाई अवकाश केंद्र, इस्रो यांसारख्या संस्थाचे समर्थपणे नेतृत्व केले होते. अवकाश विज्ञान आणि विशेषत: उपग्रह तंत्रज्ञान भारतात आणण्यात त्यांचे योगदान मोलाचे होते. विज्ञान लोकप्रिय करण्यात प्रयत्नरत राहिलेल्या गोवारीकरांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले. - सी. विद्यासागर राव, राज्यपाल
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर प्रामुख्याने अवकाश संशोधन, हवामानशास्त्र आणि लोकसंख्याविषयक संशोधनात अमूल्य योगदान देणारे व्यक्तिमत्त्व आहे. ते केवळ संशोधन करणारे शास्त्रज्ञ नव्हते, तर ते देशातील मूलभूत समस्यांची अचूक जाण आणि त्यावर उत्तर शोधणारे शास्त्रज्ञ होते. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
अवकाश संशोधन, हवामानशास्त्र आणि लोकसंख्या या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे डॉ. गोवारीकर सामाजिक दृष्टिकोन जपणारे शास्त्रज्ञ होते. मराठी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदाची त्यांची कारकिर्दही मराठी भाषा व विज्ञान या दृष्टिकोनातून लक्षणीय ठरली. भारत संपूर्ण साक्षर होण्याची गरज आहे व सर्वांना आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करायला हवी हा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायक ठरेल.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री
डॉ. वसंत गोवारीकर यांनी अवकाश, हवामान, लोकसंख्या क्षेत्रात जे काही योगदान दिले; त्यामुळे देश प्रगतिपथावर पोहोचला. भारतातील मूलभूत समस्यांची जाण असणारे व त्यांवर उत्तरे शोधणारे ते शास्त्रज्ञ होते. अर्थातच त्यांच्या निधनाने आपण एका चांगल्या मार्गदर्शकाला मुकलो आहोत.
- अरविंद परांजपे (संचालक, नेहरू तारांगण)
डॉ. वसंत गोवारीकर आणि अवकाश, हवामान, लोकसंख्या क्षेत्र हे जणूकाही समीकरणच बनले होते. हवामानाचा अंदाज, तंत्रज्ञांना उद्योजक बनवण्याच्या योजना, परदेशस्थ भारतीय संशोधकांना परत आणणे, सरकारचे विज्ञान धोरण ठरविणे व त्याचा प्रसार करणे ही कामे त्यांच्या नेतृत्वाखाली झाली. अवकाश क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान तर लाखमोलाचे असून, त्यांच्या निधनाने भारतवर्षाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. - पुष्कर वैद्य (खगोलशास्त्रज्ञ)
डॉ. वसंत गोवारीकर जेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते तेव्हा त्यांचा हवामान खात्याशी कायम संपर्क असायचा; आणि त्यानंतरही कायम ते आमच्या संपर्कात होते. गोवारीकर यांनी हवामान खात्याला मान्सूनबाबात लाख मोलाचे मार्गदर्शन केले. मान्सूनचे पूर्वानुमान, पूर्वनिकष याबाबत त्यांनी सातत्याने हवामान खात्याला अनेक बाबी उलगडून सांगितल्या. नुसत्या उलगडून सांगितल्या नाहीत तर वेळोवेळी याबाबत त्यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले. गोवारीकरांच्या निधनाने न भरून येणारी हानी झाली आहे.
- कृष्णानंद होसाळीकर (उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खाते)
कुलगुरू असताना शिक्षणातील नवीन पद्धत कशी असावी, याबाबत डॉ. गोवारीकर यांची ठाम भूमिका होती. सर्व वैज्ञानिक शाखा, विषयांमध्ये त्यांनी सामान्य माणूस समोर ठेवून संशोधन केले. हेच त्यांच्या संशोधनाचे वैशिष्ट्य होते.
- डॉ. अरुण निगवेकर, माजी कुलगुरू

ते आमचे नेहमीच प्रेरणास्थान राहिले आहेत. ते माझे चित्रपट आवर्जून पाहायचे आणि त्याबद्दलची प्रतिक्रिया द्यायचे. आमच्या कुटुंबातील मोठी व्यक्ती गेल्याचे खूप दु:ख आहे.
-आशुतोष गोवारीकर,
ज्येष्ठ दिग्दर्शक
विक्रम साराभार्इंचे ते उजवे हात होते. त्यांनी देशाचे अवकाश तंत्रज्ञान शून्यातून निर्माण केले. ज्या काळात अवकाश संशोधनाची सुरुवात त्यांनी पडलेल्या चर्चमधून केली. रॉकेटचा पुनर्वापर ही कल्पनाही त्यांनी अस्तित्वात आणली. चांद्रयान, मंगळ यान हे आज मिळणारे यश त्यांच्यामुळेच आहे. त्यांनी भारतीय अवकाश संशोधनाचा पाया रचला.
-उदय ताडे, इस्रोतील डॉ. गोवारीकर यांचे सहकारी
भारतीय हवामानशास्त्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले. भारत केवळ पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल की कमी, याचाच अंदाज वर्तवित होता. तेव्हा त्यांनी संशोधन आणि विकासातून मान्सून मॉडेल निर्माण केले, जे हवामानाचा दूरगामी अचूक अंदाज देऊ लागले. हा भारतीय हवामानशास्त्रातील एक मैलाचा दगड होता. पुढे १५ वर्षे हे मॉडेल सातत्याने वापरण्यात आले.
- डॉ. मेधा खोले, उपमहासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग

 

Web Title: The roots of Gowarikar's struggle in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.