मराठीची मुळे
By admin | Published: May 22, 2017 08:26 AM2017-05-22T08:26:27+5:302017-05-22T09:01:24+5:30
एक गाढव आणि एक कोंबडा भारतातल्या रस्त्यावर भेटले. स्वतंत्र इस्राएलची निर्मिती झाल्यावर दोघेही भारत सोडून तिथे गेले होते. पण दोघेही परत आल्याचे पाहून त्यांना एकमेकांबद्दल आश्चर्य वाटले.
Next
- अभय शरद देवरे
एक गाढव आणि एक कोंबडा भारतातल्या रस्त्यावर भेटले. स्वतंत्र इस्राएलची निर्मिती झाल्यावर दोघेही भारत सोडून तिथे गेले होते. पण दोघेही परत आल्याचे पाहून त्यांना एकमेकांबद्दल आश्चर्य वाटले. गाढवाने कोंबड्याला विचारले, " अरे मित्रा तू गेला होतास ना इस्राएल ला ? मग परत का आलास ? " "अरे काय सांगू तुला ? मला तिथे काही कामच करता आले नाही कारण इस्रायली माणूस मी रोज पहाटे अरवायच्याआतच काम सुरू करे. आणि मग तू का तिथे राहिला नाहीस ?" कोंबड्याने गाढवाला विचारले. यावर गाढवही उद्गारले, "माझेही तेच झालं ना यार. ती लोकं माझी सगळीच कामे स्वतः करत . मग मला काही कामच उरले नाही. मग भारतात परत येण्याशिवाय मला काही गत्यंतरच उरलेले नाही." इस्राएल मध्ये सांगितली जाणारी ही बोधकथा त्यांच्या कर्मयोगाची संपूर्ण माहिती सांगून जाते.
आणि मला आठवली आपल्या देशातली घडलेली बोधकथा, एका परदेशी स्त्रीला एका भारतीय व्यक्तीने विचारले, "कसा वाटला आमचा देश ?" "खूपच छान आहे तुमचा देश. इथली कुटुंबव्यवस्था आणि गरिबीतही आनंदी राहण्याची तुमची मनोवृत्ती इतर कोणत्याही देशात आढळत नाही. पण..... " " पण काय ? " त्या व्यक्तीने आश्चर्याने विचारले. "पण फार घाण आहे तुमचा देश. जिकडे बघावे तिकडे, अगदी सगळीकडे कच-याचे ढीग आहेत." यावर सारवासारवी करताना ती व्यक्ती म्हणाली, " अहो काय करणार मॅडम ? आमची लोकसंख्याच एवढी आहे की सरकारने कितीही जरी प्रयत्न केले तरी काहीही उपयोग होत नाही." "किती, लोकसंख्या किती आहे तुमच्या देशाची ?" बाईंनी विचारले. "सव्वाशे कोटी आहे." "सव्वाशे कोटी आहे ना ? मग आणखी किती लोक पाहिजेत तुम्हाला कचरा साफ करायला ? कचरा साफ करणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही तर सव्वाशे कोटी लोकांची आहे. मुळात कचरा होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी अगोदर येते, मग साफ करण्याची !" त्या परदेशी स्त्रीने आपल्या डोळ्यात घातलेले झणझणीत अंजन आणि ती वरची बोधकथा दोन्ही मनोवृत्तीतला बदल ठळकपणे सांगून जाते. किंवा शाना हब्बा बे येरुषलाईम या हिब्रू भाषेतल्या वाक्याचा अर्थ म्हणजे "पुढच्या वर्षी जेरुसलेम" ! इस्रायली लोकांचे हे परवलीचे वाक्य आहे. हे साधेसुधे वाक्य नाही तर या वाक्यामागे दोन हजार वर्षापूर्वीची वेदना आहे, प्रदीर्घ प्रतीक्षा आहे. जेरुसलेम ही त्यांची मूळ भूमी. इसवीसन सत्तर मध्ये रोमन सरदार टायसन याने जेरुसलेमवर हल्ला केला आणि ज्यू लोकांची प्रचंड कत्तल करून पराभव केला. त्यावेळी जे पळून जाऊन परागंदा झाले तेवढेच वाचले. जिवाच्या भीतीने गॅलीलीच्या खो-यातून जलमार्गाने वाट फुटेल तिथे आणि जागा मिळेल तिथे जाऊन वसले. जगाच्या पाचही खंडात समुद्रकिना-यावरच्या गावात त्यांनी वस्ती करायला सुरुवात केली. ज्या देशाने हाकलून दिले तेथून शांतपणे निघून गेले आणि भारतासारख्या ज्या देशाने आसरा दिला त्या देशाला आणि त्या देशाच्या संस्कृतीला, भाषेला आपले मानत राहिले. पण दोन हजार वर्षे बेघर आणि निर्वासित आयुष्य जगलेला प्रत्येक ज्यू माणूस आपल्या मातृभूमीला कधीच विसरला नाही. एक ना एक दिवस आपण जेरुसलेम मध्ये असणार हा दुर्दम्य आत्मविश्वास पिढ्यानपिढ्या त्यांचा श्वास बनून राहिला. प्रत्येक भेटीत ते एकमेकांना विश्वास देत राहिले की, " पुढच्या वर्षी जेरुसलेम !" ते जेरुसलेमला कधीही विसरले नाहीत. त्यांच्या हिब्रू भाषेतल्या रोजच्या प्रार्थनेतसुद्धा एक वाक्य आहे, मी जर जेरुसलेमला विसरलो तर हे विधात्या, माझा उजवा हात कापून टाक ! त्यांची प्रतीक्षा थांबली १४ मे १९४८ रोजी. त्या दिवशी ज्यू लोकांना स्वतः चा देश मिळाला आणि तब्बल दोन हजार वर्षांची भटकंती थांबली. त्यामुळे पुढच्या वर्षी जेरुसलेम या वाक्याला फार मोठा अर्थ आहे. कोणतेही ध्येय मनाशी ठरवताना इस्रायली माणूस म्हणतो, "पुढच्या वर्षी जेरुसलेम !"
अत्यंत ध्येयवादी असलेला इस्रायली माणूस अतिशय गोड आहे. दोन हजार वर्षांचा भटकंतीचा इतिहास असून सुद्धा इतरांबद्दल यत्किंचितही कटुता त्याच्या मनात नाही. आणि मुख्य म्हणजे तो त्याचे भांडवल करत नाही. (जे आपल्याकडे होतेे) जे झाले ते होऊन गेले, आता मला माझा आणि देशाचा वर्तमान आनंदी घालवायचाय अन भविष्यकाळ उज्वल करायचा आहे, त्यासाठी मला तन मन धन वेचून काम करायचे आहे असे तो मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावणा-या ज्यू लोकांची नुसती नावे जरी ऐकली तरी छाती दडपते. आलमआरा या भारताच्या पहील्या बोलपटाचे पटकथालेखन व गीतलेखन जोसेफ डेव्हीड पेणकर यांनी केले होते. रिबेका रूबेन या १९०६ मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत महाराष्ट्रात पहिल्या आल्या होत्या. चित्रपट कलावंत डेव्हीड (नन्हेमुन्हे बच्चे तेरे मूटठी मे क्या है या गाजलेल्या गीतातील) याना भारत सरकारने पद्मश्री दिली. ही झाली भारतीय यहुदी लोकांची वानगीदाखल उदाहरणे, पण जगभरात या
लोकांनी आपला ठसा सर्व क्षेत्रात उमटवला आहे. संशोधन क्षेत्रात अल्बर्ट आईन्स्टाईन आणि थॉमस एलवा एडिसन या उत्तुंग व्यक्तिमत्वांची नावे कोण विसरणार ? अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदी असलेल्या किंसीजर यांनी जगभर अमेरिकेचा दबदबा निर्माण केला. कला क्षेत्रात ज्यूरासिक पार्क बनवणा-या स्टीव्हन स्पिलबर्ग हेसुद्धा जन्माने ज्यू होते. जगातला पहिला मोबाईल मोटोरोला कंपनीने इस्राईलमध्ये तयार केला. आज इस्राईलची शेती म्हणजे शेतीचा स्वर्ग आहे. केवळ दहा मिलिमीटर पाऊस पडणा-या या देशात त्यांनी शेतीचा चमत्कार करून दाखवला आहे. अगदी अमेरिकेसारख्या देशात राहूनही ज्यू लोकांनी तेथील अर्थव्यवस्था आपल्या हातात ठेवली होती. त्यामुळे ज्यू माणूस म्हंटला की प्रचंड कष्टाळू, हुशार आणि धनवान असेच समीकरण जगभर तयार झाले. आपल्या संघर्षमय इतिहासातून ते लोक इतकेच शिकले की अपना हाथ जगन्नाथ ! आपली प्रगती ही केवळ आपणच करायची आहे. त्यामुळे प्रत्येक बाबतीत ठाम असणे आणि कट्टर असणे ओघाने आलेच ! कदाचित त्यांची ही कट्टरता आपल्याला वेडेपणाचे वाटेल पण ज्या परिस्थितीत ते जगत आहेत त्या परिस्थितीत तसे असणे स्वाभाविक वाटते. त्यांच्या तोंडातून हिब्रू भाषा ऐकताना एक लक्षात आले की ख हे व्यंजन जास्तवेळा ऐकू येते. चर्चा करताना कळले की ते लोक कधीही ह ह्या व्यंजनाचा उच्चार करत नाहीत. ह च्या ठिकाणी ख म्हणतात कारण हिटलर या शब्द ह ने सुरू होतो. मला इथून निघतानाच सांगण्यात आले होते की तुमच्या सामानात किंवा मोबाईलच्या गॅलरीमध्ये चुकूनही स्वस्तिक हे चिन्ह दिसता कामा नये किंवा इस्राईलमध्ये कधीही त्याचा उल्लेख करू नका कारण हिटलरचे बोधचिन्ह स्वस्तिक होते. स्वतःच्या विचारांवर, आचारांवर आणि कृतीवर ठाम कसे राहावे हे फक्त त्यांच्याकडून शिकावे !
१९४८ साली इस्राएल ला स्वतःची भूमी परत मिळाली. आणि त्या देशाने जगभर पसरलेल्या ज्यूना आवाहन केले की तुम्ही कुठेही असाल तरी तुम्ही इस्राईलची नागरिक आहात. इथे या आणि देश उभारण्यासाठी योगदान द्या. "पुढच्या वर्षी जेरुसलेम" याच स्वप्नात चोवीस तास असणारे जगभरातले ज्यू लोक देशसेवेसाठी आपली स्थावर जंगम मालमत्ता आहे तिथे सोडून धावत आले. भारतात १९३१ च्या जनगणनेनुसार तेवीस हजार ज्यू होते तर १९९१ च्या जनगणनेनुसार तीन हजार ज्यू शिल्लक आहेत. बाकी जणांनी इस्राईलच्या आवाहनाला तिथे जाऊन प्रतिसाद दिला.
भारतीयांच्या बद्दल इस्राएली लोकांच्या मनात प्रचंड प्रेम जाणवते. कारण दोन हजार वर्षांपूर्वी रोमन लोकांच्या हल्ल्यापासून जीव वाचवण्यासाठी ते लोक जे परागंदा झाले ते जिथे जागा मिळेल तिथे राहिले. काही लोक शिडाच्या बोटीतून भरातभूमीवर उतरले. येतायेता त्यांची वाताहत झालीच ! वादळ वा-याला तोंड देतदेत ते भारतभूमीजवळ आले खरे पण अलिबागजवळील नौगाव या बंदराजवळ त्यांच्या बोटी फुटल्या आणि अनेकांना तिथेच जलसमाधी मिळाली. आजही त्या समुद्रकिना-यावर त्यांची थडगी आहेत. आणि इस्राएल ला जाऊन स्थायिक झाले लोक आवर्जून तिथे जाऊन नतमस्तक होतात. फक्त सात जोडपी त्या प्रलयातून जिवंत राहिली. पुढे त्यातूनच निर्माण झाला महाराष्ट्रीयन इस्राईल समाज ! त्यांना बेने इस्राएल समाज म्हणतात. काही लोक कोचीन बंदरात पोहोचले त्यांना कोचिनी ज्यू म्हणतात तर जे लोक बगदाद शहरामार्गे भारतात आले त्यांना बगदादी ज्यू म्हणून ओळखले जातात. आज त्या सर्व समाजातले खूप कमी लोक भारतात राहतात. पण इस्राएल ला जाताना आपली महान संस्कृती, भाषा, परंपरा ते बरोबर घेऊन गेलेत. चार मे रोजी रामले गावात झालेल्या बेने इस्राएल लोकांच्या स्नेहसंमेलनात मी एकपात्री कलावंत म्हणून सहभागी झालो होतो. त्यावेळी पाहिले की काही स्त्रिया साडी नेसून आल्या होत्या आणि काही पुरुष कुर्तासलवार या वेशात होते. जेवायला चक्क गुलाबजाम चा बेत होता. आणि सर्वजण फक्त मराठी आणि मराठीच बोलत होते. मला तर त्यांची मराठीवरील निष्ठा पाहून गहिवरून आले. त्या कार्यक्रमाला भारताच्या सहराजदूत डॉ अंजुकुमार प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी भाषणात विचारले की तुम्हाला आमच्याकडून काय हवे आहे ? यावर एक वृद्ध उठून उभे राहिले व म्हणाले की "आयुर्वेदिक डॉक्टर आणि औषधे आम्हाला इथे मिळत नाहीत. त्यांची सोय करता आली तर करा." ते होईल की नाही हे माहीत नाही पण कोणत्याही बाबतीत हे लोक भारताला विसरू शकत नाहीत हेच यातून दिसते. कारण भारत हा असा जगाच्या पाठीवरचा एकमेव देश आहे की कोणताही संबंध नसताना ज्यू लोकांना दोन हजार वर्षे त्याने आसरा दिला. त्यांचा धर्म त्यांना त्यांच्या पद्धतीने पाळू दिला. कधीही अल्पसंख्यांक म्हणून त्रास दिला नाही. भारतासारख्या सहिष्णू देश जगाच्या पाठीवर कुठेही नाही हे ते अभिमानाने सांगतात. आणि इथे राहणा-या लोकांना हा देश असहिष्णू कसा वाटतो हे मात्र समजत नाही.
हजारो वर्षांची धार्मिक सामाजिक परंपरा असणारा आपला भारत देश आणि दोन हजार वर्षांच्या निर्वासितांची परंपरा असणारा इस्राएल देश यांच्यात एक वेगळाच ऋणानुबंध आहे. दुधात साखर मिसळावी तसा हा समाज इथे मिसळून गेला होता. तो तिथे जरी स्थायिक झाला तरी या भूमीला कधीही विसरला नाही, यापुढेही विसरणार नाही. चार दिवस त्यांच्याबरोबर राहताना एक गोष्ट लक्षात आली की अरे, ही आपल्याच रक्ताची माणसे, देश वेगवेगळे असतील पण मुळे तीच......मराठी भाषेची..... मराठी संस्कृतीची !!