मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच!
By admin | Published: October 22, 2014 06:31 AM2014-10-22T06:31:14+5:302014-10-22T06:35:59+5:30
विदर्भातील ४० आमदारांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचे मानले जात आहे
नागपूर/मुंबई : विदर्भातील ४० आमदारांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचे मानले जात आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढविली गेल्याने तेच मुख्यमंत्रिपदाचे स्वाभाविक दावेदार मानले जात होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा मिळवून देत गडकरींनी एक पाऊल पुढे टाकले असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
सरकार स्थापनेचा मुहूर्त दिवाळीनंतर काढला जाणार असल्यामुळे भाजपा प्रदेश कार्यालयातील कर्मचारी आणि आमदार आपापल्या गावी दिवाळी साजरी करण्यासाठी गेलेले असतानाच नागपुरातील घडामोडींनी चर्चेला ऊत आला. मंगळवारी सायंकाळी विदर्भातील तब्बल ४० आमदार विमानाने मुंबईहून नागपुरात दाखल झाले. त्यांनी गडकरी यांची ‘वाड्यावर’ जाऊन भेट घेतली आणि ‘भाऊ, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा’, असे साकडे गडकरींना घातले. या सर्व घडामोडीनंतर गडकरींनी आपण दिल्लीत खूश आहोत; पण आमदारांच्या भावना दिल्लीला कळवू, असे सांगत पक्ष घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल, असे सूचक विधान केल्याने मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीबाबतचा संभ्रम आणखीच
वाढला. (विशेष प्रतिनिधी)