वाघोलीच्या शनिमंदिरात प्रसाद म्हणून मिळते रोप
By admin | Published: August 6, 2016 02:51 AM2016-08-06T02:51:55+5:302016-08-06T02:51:55+5:30
एरव्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो की, साखर फुटाणे किंवा खोबऱ्याचा प्रसाद नित्याचा असतो.
वाघोली/वसई : एरव्ही मंदिरात दर्शनासाठी गेलो की, साखर फुटाणे किंवा खोबऱ्याचा प्रसाद नित्याचा असतो. मात्र, त्या जागी तुम्हाला कुणी ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत हातावर झाडाचे रोप ठेवले तर कसं वाटेल. चकित झालात ना? पण असा अभिनव प्रयोग तालुक्यातील वाघोली येथील शनिमंदिरात सुरु असून दर शनिवारी येथे भक्तांची रीघ असते.
येथील नाईक बंधूंनी फुलारे आळीत हे मंदिर बांधले आहे. विशेष म्हणजे या वास्तूची उभारणी अवघ्या ९० दिवसांमध्ये करण्यात आलेली आहे. हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या मंदिराचा परिसर अतिशय रम्य असा आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री शनिदेवांची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे.
मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा अतिशय रमणीय व प्रसन्न आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी नि:शुल्क ध्यान केंद्रही बनवलेले आहे. ट्रस्टच्या मार्फत गेली काही वर्षे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून फुलझाडेवाटप केली जात असतात. शेतीप्रधान वसई तालुक्यातून हिरवळ नामशेष होत चालली असताना ट्रस्टच्या माध्यमातून एक वेगळी चळवळ उभी केली गेली आहे.
नाईक बंधूनी ट्रस्टच्या मार्फत ५ लाखांहून अधिक फुले व फळझाडांचे मोफत वाटप केलेले आहे. तसेच सौरऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहित करणारे सौरऊर्जा केंद्र, ५० टक्के सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध करून देणारी मणीबाई फुलारे ट्रस्ट अशा विविध सामाजिक कार्यातून एक वेगळाच ठसा उमटवला आहे. आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिर,वृक्षारोपण, खाद्य - नाट्यसंगीत महोत्सव, एकांकिका स्पर्धा, क्रीडा स्पर्धा अशा विविध सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन वर्षभर सुरू असते. एकंदरीत वन डे पिकनिकसाठी हे चांगले ठिकाण आहे. (वार्ताहर)
>श्रावणी शनिवारी खवय्यांना मेजवानी
श्रावण महिन्यापासून वर्षाऋतू सुरू होतो. पौर्णिमेजवळ श्रवण नक्षत्र येत असल्याने प्रत्येक शनिवारी वाघोली शनिमंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी स्थानिक महिलांकडून सामवेदी खाद्यपदार्थही खवय्यांना चाखायला मिळत असतात. पुरणपोळी, आळूवडी, भरलेले मोदक, खरवस, दुधाचे लाडू, शेवई, थालीपीठ, पिठलेभाकर अशा नानाविध प्रकारांसोबत सामवेदी पांगी हा प्रकारही लोकांना खायला मिळतो.
>गुडघेदुखीवर मोफत औषध : मंदिराच्या उजव्या बाजूला गोलाकार चौथरा बांधण्यात आलेला आहे. चौथऱ्यावर श्री शनिदेवाची प्रतीकात्मक मूर्ती असून सोबत हनुमंताचीही मूर्ती प्रतिष्ठापित केलेली आहे. तेल, श्रीफळ या चौथऱ्यावरच वाहून पूजा केली जाते. भाविक त्यावर तेलाभिषेक करून मगच मुख्य मंदिरातील मूर्तीचे दर्शन घेतात. वाहून जाणारे तेल जमा करून त्यात वनौषधी टाकून ते तेल नंतर भाविकांना गुडघेदुखीवर मोफत दिले जाते. दर शनिवारी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.