बालेकिल्ल्यासाठी रस्सीखेच
By admin | Published: January 17, 2017 06:15 AM2017-01-17T06:15:48+5:302017-01-17T06:15:48+5:30
दादरवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, शिवसेना, भारतीय जनता पार्टीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे.
मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दादरवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, शिवसेना, भारतीय जनता पार्टीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे.
विशेषत: शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये दादरसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मनसेनेही यात उडी घेतली आहे. मुळात स्थापनेपासूनच शिवसेनेचे दादरमध्ये वर्चस्व आहे. मनसेने शिवसेनेच्या वर्चस्वाला खिंडार पाडले. परिणामी, हे शिवसेनेला जिव्हारी लागले होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दादर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखलेली आहे. त्यात आता डिवचण्याचे काम भाजपाकडून सुरू झाले आहे.
दादरचा प्रभाग क्रमांक १९१ मध्ये मनसेचे संदीप देशपांडे हे नगरसेवक आहेत. येत्या निवडणुकीत मनसेला दणका देण्यासाठी शिवसेना पूर्ण तयारी करत आहे. विशेष म्हणजे, भाजपानेही मुद्दाम डिवचण्याचे प्रकार सुरू केले आहेत.
युती झाल्यास भाजपाने १९१ प्रभागासाठी आग्रह धरणे सुरू केले आहे. भाजपाने या प्रभागातून पोदार महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मेधा ओक-सोमय्या यांचे नाव पुढे केले आहे. अजून युतीचे घोंगडे भिजत असताना, भाजपाने नाव पुढे सरकवल्याने शिवसेनेसमोर पेच निर्माण झाला आहे. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या हातून हा प्रभाग आधीच निसटला आहे. महिला राखीव प्रभाग झाल्याने त्यांची दांडी उडाली आहे.
तथापि, संदीप यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांचे नाव मनसेत सध्या अग्रस्थानी आहे. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यात भाजपाने मेधा सोमय्या यांचे नाव पुढे केले.
भाजपा आणि मनसेच्या या दोन्ही संभाव्य उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी शिवसेनेनेही खेळी खेळली आहे. शिवसेना विशाखा राऊत यांचे नावे निश्चित करणार आहे. एकंदरीत १९१ प्रभागातून शिवसेना, भाजपा आणि मनसेची जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. (प्रतिनिधी)
>विशाखा राऊत : आमदार आणि माजी महापौर म्हणून विशाखा यांची ओळख आहे.
स्वप्ना देशपांडे : मनसे नगरसेवक
संदीप देशपांडे यांच्या पत्नी.
मेधा सोमय्या : भाजपाचे ईशान्य मुंबईचे खासदार यांच्या पत्नी आणि पोदार महाविद्यालयाच्या प्राध्यापिका म्हणून मेधा यांची ओळख आहे, शिवाय दादर हे मेधा यांचे माहेरघर आहे.
>शिवसेनेची कसोटी
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून दादरची ओळख असली, तरी मनसेने हा बालेकिल्ला यापूर्वी महापालिकेच्या निवडणुकीत बळकावला होता. त्यामुळे शिवसेनेची येथे कसोटी लागणार आहे.
>भाजपाने बांधला चंग
शिवसेनेला दादर द्यायचे नाही, असा चंगच भाजपाने बांधला आहे. मुंबई भाजपाने यासाठी जोरदार फिल्डिंग लावली असून, काही झाले, तरी दादर शिवसेनेकडे जाऊ द्यायचे नाही, यासाठी भाजपा सर्व तयारीनिशी मैदानात उतरली आहे.