विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच
By admin | Published: December 6, 2014 03:06 AM2014-12-06T03:06:38+5:302014-12-06T03:06:38+5:30
नागपूरचे विधिमंडळ अधिवेशन ८ डिसेंबरला सुरू होत असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण, हे अद्याप ठरलेले नाही.
मुंबई : नागपूरचे विधिमंडळ अधिवेशन ८ डिसेंबरला सुरू होत असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण, हे अद्याप ठरलेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची या पदासाठी रस्सीखेच सुरू असून विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे कोणाच्या बाजूने कौल देतात याची उत्सुकता आहे.
कालपर्यंत विरोधी पक्षात असलेली शिवसेना आज सरकारमध्ये सामील झाली. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. विशेष अधिवेशनात विरोधी पक्षनेते झालेले शिंदे आता नागपुरात मात्र सत्तारूढ बाकावर दिसतील.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. राष्ट्रवादीतर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील अशी नावे चर्चेत आहेत. आर.आर.पाटील यांची प्रकृती सध्या बरी नाही अन्यथा त्यांचेच नाव समोर राहिले असते. काँग्रेसतर्फे गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव चर्चेत आहे. (विशेष प्रतिनिधी)