मराठा आरक्षणप्रश्नी पुण्यात होणार गोलमेज परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 09:19 AM2020-08-11T09:19:05+5:302020-08-11T09:19:35+5:30
१९ ऑगस्टला पुण्यात राज्यातील ६० हून अधिक मराठा संघटनांची गोलमेज परिषद
कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी सरकार नेमके काय करत आहे, याची माहिती संघटनांना दिली जात नाही. त्यामुळेच या प्रश्नावर विचार करून पुढील दिशा ठरविण्यास १९ ऑगस्टला पुण्यात राज्यातील ६० हून अधिक मराठा संघटनांची गोलमेज परिषद होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील आणि मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
सुरेश पाटील म्हणाले की, आम्हाला यात राजकारण आणायचे नाही. पण संघटनांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तर महाडिक म्हणाले, मराठा आरक्षणासाठी बळी पडलेल्यांच्या कुटुंबातील एकाला राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत घेण्याची घोषणा तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. त्यातील काहीही झालेले नाही. मराठा मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभारण्याचा देखावा केला. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला ५ कोटी देण्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती, ते मिळाले नाहीत. ज्या कामात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी ‘कॅग’नेही ताशेरे ओढले ते शिवस्मारकाचे काम थांबले आहे. या सर्व मागण्या या परिषदेत मांडण्यात येतील.
मेटेंना हवी आमदारकी
मराठा आरक्षणप्रश्नी नेमलेल्या मंत्री समितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटविण्याची मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. याबाबत महाडिक म्हणाले, त्यांनी या प्रश्नाच्या जीवावर आमदारकी मिळविली. ती मुदत संपत आली आहे. पुन्हा आमदारकी मिळविण्यासाठी असे बोलावे लागते.
हे तर राजकीय षड्यंत्र
मुंबई : मराठा आरक्षण कायम राहू नये, यासाठी मोठे राजकीय षड्यंत्र सुरू आहे. राज्य सरकारवर जाणीवपूर्वक धादांत खोटे आरोप केले जात आहेत. या आंदोलनामागचा बोलविता धनी वेगळा असून, ही आंदोलने भाजप पुरस्कृत असल्याचा थेट आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.