सीएसटीतील हार्बर लाइनचे मार्ग बदलणार

By admin | Published: January 18, 2017 06:13 AM2017-01-18T06:13:03+5:302017-01-18T06:13:03+5:30

पाचवा-सहाव्या मार्गिकेसाठी आवश्यक असणाऱ्या हार्बरवरील दोन मार्गाचे लवकरच स्थलांतर केले जाणार आहे.

The route of the Harbor line between CST will be changed | सीएसटीतील हार्बर लाइनचे मार्ग बदलणार

सीएसटीतील हार्बर लाइनचे मार्ग बदलणार

Next

सुशांत मोरे,

मुंबई- पाचवा-सहाव्या मार्गिकेसाठी आवश्यक असणाऱ्या हार्बरवरील दोन मार्गाचे लवकरच स्थलांतर केले जाणार आहे. सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्गाला आवश्यक असणाऱ्या जागेसाठी सीएसटीतील हार्बरचे दोन मार्ग उपलब्ध होणार असून, त्याला रेल्वे बोर्डाकडून तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सीएसटी स्थानकातील हार्बरचे दोन्ही प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या बाजूला असलेल्या पी.डी.मार्गाजवळ जातील. तत्त्वत: मंजुरीनंतर आता प्रकल्पाचा खर्च, आरेखन आदींवर मध्य रेल्वेकडून काम सुरू करण्यात आले असून, त्याची अंतिम मंजुरीही घेण्यात येईल.
सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्गाचे काम केले जाणार असून, हे काम दोन टप्प्यांत होईल. परळ ते कुर्ला आणि कुर्ला ते सीएसटी असे काम केले जाईल. यातील परळ ते कुर्ला पट्ट्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, ही मार्गिका कुर्ला ते सीएसटीपर्यंत आणताना जागेची अडचण सतावत आहे. ही अडचण सोडविण्यासाठी कुर्ला स्थानकातील हार्बरचे दोन्ही प्लॅटफॉर्म एलिव्हेटेड बांधण्यात येतील. कुर्ला स्थानकात दोन अतिरिक्त मार्गिका असल्या, तरी त्या मार्गिका मालवाहतुकीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे हार्बरचे दोन प्लॅटफॉर्म आठ मीटरवर उचलण्यात येतील आणि त्याखालून पाचव्या-सहाव्या मार्गिकेला जागा मोकळी केली जाईल, परंतु त्यानंतर ही मार्गिका आणण्यासाठी असलेली अडचण पाहता, डॉकयार्ड रोड स्थानकानंतर दोन्ही मार्गिका डावीकडे वाडीबंदर यार्डमधून सीएसटीच्या १८ नंबर प्लॅटफॉर्मकडील पी.डिमेलो मार्गाकडे नेल्या जातील. त्यामुळे सीएसटीतील हार्बरचे दोन्ही प्लॅटफॉर्म पी.डिमेलोच्या दिशेला स्थलांतर केले जातील. दोन्ही प्लॅटफॉर्म स्थलांतर होताच, सीएसटीत प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ हे मेन धिम्या मार्गासाठी, ३ आणि ४ नंबर प्लॅटफॉर्म जलद मार्गासाठी आणि ५ व ६ नंबर प्लॅटफॉर्म हे मेल-एक्स्प्रेससाठी उपलब्ध होतील. या संदर्भात मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे बोर्डाकडून तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. तत्त्वत: मंजुरी दिल्यामुळे प्रकल्पाच्या अन्य कामांना वेग येईल. त्यामुळे अंतिम माहिती असलेला अहवाल तयार केला जाईल आणि त्याची रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरी घेतली जाईल.
>हार्बरचे दोन प्लॅटफॉर्म उन्नत
सीएसटीच्या १८ नंबर प्लॅटफॉर्मजवळ होणारे हार्बरचे दोन्ही प्लॅटफॉर्म हे उन्नत होतील. त्यावर बऱ्याच सोईसुविधा दिल्या जातील. मात्र, हार्बर प्रवाशांना या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी बरीच पायपीट करावी लागेल. त्यामुळे मोठा मनस्तापही होऊ शकतो.

Web Title: The route of the Harbor line between CST will be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.