बॉक्साईट वाहतुकीत नियमांना हरताळ

By admin | Published: April 29, 2016 03:49 AM2016-04-29T03:49:05+5:302016-04-29T03:49:05+5:30

तालुक्यातील खाणीतून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बॉक्साईटचे उत्खनन होत आहे.

Routine Bauxite Traffic Rules | बॉक्साईट वाहतुकीत नियमांना हरताळ

बॉक्साईट वाहतुकीत नियमांना हरताळ

Next

श्रीकांत शेलार,

श्रीवर्धन- तालुक्यातील खाणीतून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बॉक्साईटचे उत्खनन होत आहे. या प्रकारात उत्खननासाठी परवाना घेण्यापासून ते कारखान्यात पोचवण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साईट विपुल प्रमाणात आहे. शेखाडी, खुजारे, कुडगाव, कुरवडे-मारल तसेच सायगाव, मेघरे येथे प्रामुख्याने बॉक्साईटचे साठे आहेत. गेली बारा वर्षे येथे आशापुरा माईनसाठी अल्टगेज स्टोन क्र शर ही कंपनी खाणकाम करत आहे. साधारण २१०० एकरांतील खाणक्षेत्रात पाच कोटी टन साठा असल्याचा अंदाज आहे. वर्षाला एका खाणीतून एक ते तीन लाख टन उत्खनन होत असून कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होते. मात्र हे उत्खनन होत असताना नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
खाणीतून उत्खनन करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने नियम ठरवून दिले आहेत. परवानगी मिळेपर्यंत हे नियम कागदावर असतात. एकदा का परवाना मिळाला, की हवे तसे उत्खनन केले जाते. राज्यात सर्वच खाणींची ही अवस्था आहे. खाणीचे उत्खनन करताना किंवा त्यातून बॉक्साईट काढताना खनिकर्म विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार एक विशिष्ट चौकोनी खड्डा करून त्यातील उत्खनन आधी करावे, त्यानंतर तो खड्डा बुजवून अन्य चौकोनात बॉक्साईडचे उत्खनन होणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्ष खाणींची स्थिती पाहिली तर सर्रास उत्खनन करून मोठे खड्डे करून ते कधीही भरले जात नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय उत्खनन नेमके किती झाले, याची मोजदाद करणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने त्याचा फायदा खाणमालक घेत आहेत. खाणीतून बाहेर पडणारे बॉक्साईट तपासण्यासाठीची जबाबदारी जिल्हा पातळीवरील खनिकर्म विभागाची असते. परंतु या विभागाचे अधिकारी देखरेख करण्यासाठी फिरकतही नाहीत. बॉक्साईटची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर अचानक धाड पडल्यास खरी परिस्थिती उघड होऊ शकते.
बॉक्साईटच्या बेसुमार वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा होत आहे. वृक्षांचीही हानी होत आहे. शिवाय अनेक ठिकाणी अपघात होऊन निरपराधांचे बळी जात आहेत.
श्रीवर्धन तालुक्यातील हरेश्वर ते आराठी तसेच आराठी ते दिघीपर्यंत या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. बॉक्साईटच्या खाणींवर स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडून केवळ कागदोपत्री लक्ष ठेवले जात आहे. मात्र प्रत्यक्षातील स्थिती भयानक असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे.
>खाणकामावर नियंत्रणच नाही
खाणीतील बॉक्साईटचे उत्खनन कोट्यवधींच्या घरातील आहे. विपुल नैसर्गिक संपदा असलेल्या या भागात बेछूटपणे आणि बेकायदा खाणकामाविरोधात पर्यावरणवादी संघटनांनी व परिसरातील जागरूक नागरिकांनी सातत्याने आवाज उठविला आहे. तथापि नियमबाह्य खाणकामास लगाम घालण्यात शासकीय यंत्रणेला अपयश येत आहे. कायद्याने घालून दिलेली बंधने पाळली तरच येथील नैसर्गिक अस्तित्व टिकेल, खाणींना परवाना देताना खाणकामाच्या जागेत वृक्षारोपण व त्यांचे संगोपनाचे बंधन घालणे गरजेचे असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

Web Title: Routine Bauxite Traffic Rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.