ऐतिहासिक फलटण नगरीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शाही स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 07:45 PM2019-07-04T19:45:57+5:302019-07-04T20:19:34+5:30
तरडगावातुन माऊली माऊलीच्या जयघोषात सकाळी साडे सहाच्या सुमारास पालखी मोठ्या उत्साहात निघाली.
अमोल अवचिते
फलटण : तुझी सेवा करेन मनोभावे हो ! माझे मन गोविंद रंगले हो! नवसिले माझे नवसिले हो! पंढरीचे दैवत हो बाप ! रुखमादेवी विठ्ठल हो! चित्त चैतन्य चोरुनी नेले!
चांदोबाचा लिंब येथे रंगलेल्या पहिल्या उभ्या रिंगण सोहळ्याची ऊर्जा घेऊन तरडगाव मुक्कामानंतर शाही स्वागतात ऐतिहासिक फलटण नगरीत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विमानतळ मैदानावर विसावली.
तरडगावातुन माऊली माऊलीच्या जयघोषात सकाळी साडे सहाच्या सुमारास पालखी मोठ्या उत्साहात निघाली. पहिला विसावा दत्त मंदिर काळज सुरवडी, दुसरा विसावा निंभोरे ओढा तर फलटण दुध डेअरी येथे तिसरा विसावा घेऊन फलटण नगरीत संध्याकाळी सहाच्या सुमारास विसावली.
तालुका दूध संघावर पालखी दिंड्यातील विणेकऱ्यांचे श्रीफळ आणि शाल देऊन स्वागत करण्यात आले. निंबाळकर देवस्थानने पालखीचे स्वागत केले. पालखीच्या स्वागतासाठी नगरातील भक्तांनी मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. फलटणचे ग्राम दैवत असलेल्या श्री राम मंदिरात वारकऱ्यांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बाजूलाच एक मुखी दत्त मंदिर आहे. मंदिरातच वारकरी विसावा घेत होते. तर काहींनी फुगडीचे फेर धरले होते. राम मंदिर आणि मशीद जवळच असल्याने राम रहीमचा सुंदर मिलाफ येथे दिसून आला.
सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. मात्र पावसाची हजेरी चुकल्यासारखी वाटत होती. उत्साहाने वारकरी भजनात तल्लीन होऊन मार्गावर चालत होते.
फलटण नगरीत पालखीच्या स्वागताची उत्सुकता दिसून येत होती. ठिकठिकाणी पाणी वाटप , अन्नदान करण्यात येत होते. मुबंईतील माऊली फाउंडेशनकडुन फलटण नगरीत येऊन मोफत औषध वाटप आणि अन्नदान करण्यात आले. दिंडी पालखी स्थळाजवळ रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचे नळ बसविले आहेत.
वारकऱ्यांसाठी उत्तम सोय करण्यात आली होती. फलटण नगरीत एकूणच भक्तिमय वातावरण होते. गावकरी वारकऱ्यांची सेवा करण्यात व्यस्त होते.
........
फलटण हे हिंदुस्थानातील एक संस्थान होते. नाईक-निंबाळकर हे संस्थानचे राजा होते. फलटण हे एक पुरातन शहर असून बाणगंगा नदी तिरावर वसलेले आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटण ओळखले जात असे. दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची जत्रा होते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तर भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. फलटण येथील पुरातन जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे.
* पालखी शुक्रवारी फलटण मधुन सकाळी मार्गस्थ होऊन बरडमध्ये मुक्कामी विसावणार आहे.