एक जागा मुंबईतली, एक बाहेरची... छोट्या-मोठ्या भावांकडे मागणी आठवलेंची

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 05:23 PM2019-02-25T17:23:03+5:302019-02-25T17:29:17+5:30

शिवसेना, भाजपाकडे रिपाईंची नवी मागणी

rpi demands two seats from shiv sena and bjp for lok sabha election 2019 | एक जागा मुंबईतली, एक बाहेरची... छोट्या-मोठ्या भावांकडे मागणी आठवलेंची

एक जागा मुंबईतली, एक बाहेरची... छोट्या-मोठ्या भावांकडे मागणी आठवलेंची

मुंबई: शिवसेना-भाजपामधील जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी एनडीएकडे दोन जागा मागितल्या आहेत. आम्ही एनडीएसोबत कायम राहू. मात्र आम्हाला दोन जागा द्याव्यात, अशी मागणी आठवलेंनी केली. शिवसेना आणि भाजपानं त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा रिपाईंसाठी सोडावी, असं आठवलेंनी म्हटलं आहे. 

'रिपाईंच्या काही मागण्यात आहेत. लोकसभेच्या 2 जागा आम्हाला हव्या आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजपानं त्यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा आमच्यासाठी सोडावी. यातील एक जागा मुंबईतली असावी आणि दुसरी मुंबईबाहेरची असावी,' अशी मागणी आठवलेंनी केली. त्यामुळे आता युतीमध्ये पुन्हा एकदा जागावाटपावरुन घमासान होण्याची शक्यता आहे. भाजपा आणि शिवसेनेनं गेल्याच आठवड्यात युतीची घोषणा केली. या चर्चेत आपल्याला विश्वासात घेण्यात आलं नाही, असं म्हणत आठवलेंनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. 




शिवसेना लोकसभेच्या 23, तर भाजपा 25 जागा लढवेल, अशी घोषणा भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. या जागावाटपावर आठवलेंनी आक्षेप घेतला होता. भाजपा आणि शिवसेनेनं रिपाईंवर अन्याय केल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली होती. 'युतीच्या वाटाघाटीत दोघांच्याच जागा वाटपावर तोडगा निघाला आहे. आम्ही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही. तसंच बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातही निवडणूक लढणार नाही,' असं आठवलेंनी चारच दिवसांपूर्वी म्हटलं होतं. यानंतर आज त्यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं प्रमुख कार्यंकत्याबरोबर चर्चा केली.

रिपाईंनं दोन जागांची मागणी केली असताना महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं भाजप-सेना युतीकडे पाच जागांची मागणी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाला 5 जागा देण्यात याव्यात, अशी आमची मागणी असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाने प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने येत्या 5 मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महामेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. 

Web Title: rpi demands two seats from shiv sena and bjp for lok sabha election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.