रिपाइं ऐक्यासाठी राजीनामा द्यायला तयार
By admin | Published: May 28, 2017 12:38 AM2017-05-28T00:38:47+5:302017-05-28T00:38:47+5:30
रिपब्लिकन पक्षाची एकजूट ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य टिकविण्याची जबाबदारी घेतल्यास मी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा
- लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रिपब्लिकन पक्षाची एकजूट ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य टिकविण्याची जबाबदारी घेतल्यास मी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी रिपाइंचे ऐक्य करण्यापूर्वी आठवले यांनी राजीनामा द्यावा, असे सांगितले होते. त्याकडे लक्ष वेधल्यावर आठवले म्हणाले की, गेल्या ७० वर्षात जे झाले नाही, ते गेल्या तीन वर्षात करण्याचा प्रयत्न झाला. काही लोक संविधान बदलण्यात येणार असल्याचा आरोप करतात परंतु भारताचे संविधान बदलले जाणार नाही. तसेच आरक्षणही कायम राहील.
सहारनपूर येथील घटना ही चुकीचीच आहे. परंतु केवळ भाजपा सत्तेवर आली म्हणून दलितांवर अत्याचार सुरू झाले असे म्हणता येणार नाही. उत्तर प्रदेशात दलितांवर अत्याचार हे यापूर्वीही होत होते. दलित अत्याचारात उत्तर प्रदेश हा नेहमीच पुढे राहिला आहे. असे असले तरी ही घटना घडायला नको होती, असेही आठवले यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी आमच्या पक्षाचीही मागणी आहे. परंतु कर्जमाफीपेक्षा कर्जातून मुक्ती आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, अशी यंत्रणा निर्माण करावी.
तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कुठून निधी उभा करता येईल, यासाठी विरोधी पक्षानेही सुद्धा बसून चर्चा करावी, केवळ विरोध करू नये, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम लोकांना आवडत आहेत. त्यांच्या नेतृत्वात देश नक्कीच प्रगती करेल असा विश्वास लोकांमध्ये असल्याने
२०१९ च्या निवडणुकासुद्धा आम्हीच जिंकू.
- रामदास आठवले, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री