रोहितच्या आत्महत्येविरोधात रिपाइं एकतावादीची निदर्शने
By admin | Published: January 26, 2016 03:10 AM2016-01-26T03:10:53+5:302016-01-26T03:10:53+5:30
हैदराबाद विद्यापीठातील पीएच.डी.चा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येला जबाबदार असणारे कुलगुरू अप्पाराव यांना बडतर्फ करून अटक करावी, देशभरातील सर्व विद्यापीठांमध्ये
ठाणे : हैदराबाद विद्यापीठातील पीएच.डी.चा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येला जबाबदार असणारे कुलगुरू अप्पाराव यांना बडतर्फ करून अटक करावी, देशभरातील सर्व विद्यापीठांमध्ये जातनिर्मूलन समिती स्थापन करून, त्यामध्ये अनुसूचित जातीच्या सदस्यांना नियुक्त करावे, या मागणीसाठी रिपाइं एकतावादीने सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. १७ जानेवारी २०१६ रोजी हैदराबाद विद्यापीठामध्ये दलित विद्यार्थी रोहित वेमुला याने आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी भडकावू विधाने करून दलित आणि ओबीसींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, तर केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनीही संभ्रमाचे वातावरण निर्माण केले आहे, असा आरोप करून रिपाइं एकतावादीचे प्रदेश युवाध्यक्ष भय्यासाहेब इंदिसे आणि महासचिव उत्तमराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी पत्रकारांशी बोलताना भय्यासाहेब इंदिसे यांनी या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रेय यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली. निदर्शकांच्या वतीने जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)