पीडित कुटुंबाला १ कोटीची भरपाई
By admin | Published: June 11, 2017 01:30 AM2017-06-11T01:30:15+5:302017-06-11T01:30:15+5:30
सुमारे ११ वर्षांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या सुदाम औटी या पुण्यातील व्यक्तीच्या कुटुंबाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे एक कोटी रुपयांहून अधिक भरपाई मिळणार आहे.
- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुमारे ११ वर्षांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या सुदाम औटी या पुण्यातील व्यक्तीच्या कुटुंबाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे एक कोटी रुपयांहून अधिक भरपाई मिळणार आहे.
ज्या टेम्पोने समोरून धडक दिल्याने सुदाम यांचा २५ मे २००६ रोजी जागीच मृत्यू झाला त्या टेम्पोचा मालक आणि त्या वाहनाचा विमा उतरविलेली न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी यांनी मिळून औटी कुटुंबास ७८ लाख ११ हजार ५३३ रुपये भरपाईपोटी द्यावेत, असा आदेश न्या. एम. एस. सोनक यांनी दिला. या रकमेवर भरपाईचा दावा दाखल केला तेव्हापासूनचे सात टक्के दराने व्याजही मिळणार असल्याने एकूण भरपाई सव्वा कोटी रुपयांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे.
अपघात झाला तेव्हा सुदाम ४६ वर्षांचे होते व ते रिलायन्स इंडस्ट्रिजच्या पातळगंगा कारखान्यात मॅनेजर म्हणून नोकरीस होते. मारुती अल्टो मोटारीने काही जणांसोबत अहमदनगर-कल्याण रस्त्यावरून ओझरच्या दिशेने जात असता समोरून येणाऱ्या टेम्पोने अल्टोला जोरदार धडक दिल्याने सुदाम यांचा जागीच मृत्यू झाला होता. पत्नी, मुले व आईने केलेला भरपाईचा दावा मंजूर करून पुण्याच्या मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने एप्रिल २०११ मध्ये ७१ लाख ३६ हजार ९१७ रुपयांची भरपाई सात टक्के व्याजासह मंजूर केली होती. त्याविरुद्ध विमा कंपनी अपिलात आली होती.
भरपाईची रक्कम निम्मी म्हणजे ३५ लाख रुपये करावी, अशी विमा कंपनीची मागणी होती. न्या. सोनक यांनी दोन्ही बाजूंचा विचार केला आणि अपघात होण्यात स्वत: सुदाम यांच्या निष्काळजीपणाचा काहीच भाग नव्हता या निष्कर्षावर शिक्कामोर्तब केले.
सोबतच न्याायधिकरणाने केलेला हिशेब चुकला असल्याने न्या. सोनक यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेमधील विशेषाधिकाराचा वापर करून पुन्हा हिशेब केला आणि भरपाई वाढवून दिली आहे. त्यामुळे कंपनीला जास्त रक्कम द्यावी लागेल.
- औटी कुटुंबाच्या वतीने असे दाखवून देण्यात आले की, सुदाम मोबाइलवर बोलत गाडी चालवीत होते याला कोणताही पुरावा नाही, कारण अपघातस्थळाच्या पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात मोबाइल मिळालेला नाही. मोबाइलबाबत कुणालाच माहिती नाही.