‘बॅँक आॅफ महाराष्ट्र’ला १३०० कोटींचा तोटा
By admin | Published: May 5, 2017 03:58 AM2017-05-05T03:58:55+5:302017-05-05T03:58:55+5:30
राज्यातील आघाडीची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक आॅफ महाराष्ट्रला २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ हजार ३७३ कोटी रुपयांचा
पुणे : राज्यातील आघाडीची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक आॅफ महाराष्ट्रला २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ हजार ३७३ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. तसेच बँकेच्या एकूण अनुत्पादित कर्जामध्ये (एनपीए) १७ हजार १८९ कोटी एवढी मोठी वाढ झाली असून, हे प्रमाण १६.९३ टक्के आहे. तर ३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत बँकेला ४५५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे.
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मराठे म्हणाले, बँकेला २०१५-१६ या आर्थिक वर्षात १०१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. मात्र, यंदा २०१६-१७ या आर्थिक वर्षात बँकेला १ हजार ३७३ कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. बँकेच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा तोटा आहे. अनुत्पादित कर्जांत झालेली वाढ हे त्याचे मुख्य कारण आहे. बँकेच्या एकूण अनुत्पादित कर्जांची रक्कम १६.९३ टक्क्यांपर्यंत म्हणजेच १७ हजार १८९ कोटींपर्यंत वाढली आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ च्या अखेरीस ही रक्कम १० हजार ३८६ कोटी होती. बँकेने मार्च २०१७ अखेर अनुत्पादित कर्जांसाठी ३,८०० कोटींची तरतूद (प्रोव्हिजन) केली असून ही तरतूद मागील आर्थिक वषार्पेक्षा ८० टक्क्यांनी अधिक आहे. तर बँकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षात ८१० कोटी रोख वसूल केल्याचेही मराठे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)