पाण्यासाठी १४३ कोटींचा बुस्टर
By Admin | Published: October 20, 2015 02:15 AM2015-10-20T02:15:56+5:302015-10-20T02:15:56+5:30
कमी पावसामुळे यंदा राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचे चटके आतापासूनच जाणवू लागले आहेत. मराठवाड्यात अवघा १५ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे आॅक्टोबर हीटपेक्षा जास्त चटके
- नारायण जाधव, ठाणे
कमी पावसामुळे यंदा राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचे चटके आतापासूनच जाणवू लागले आहेत. मराठवाड्यात अवघा १५ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे आॅक्टोबर हीटपेक्षा जास्त चटके या टंचाईने बसत असून त्यावर मात करण्यासाठी राज्यात राबविलेल्या व राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या विभागांसाठी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने २०१५-१६ करिता १४३ कोटी ३५ लाख ११ हजारांची मदत गेल्या आठवड्यात वितरीत केली आहे. यात सर्वाधिक रक्कम टंचाईने त्रस्त झालेल्या मराठवाड्याची तृष्णा भागविण्यासाठी ९६ कोटी रुपये दिले.
यातून विंधन विहिरी खोदणे, त्यांची दुरुस्ती करणे, विहिरींतील गाळ काढणे, त्या अधिग्रहीत करणे, नळयोजनांची दुरुस्ती करणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, नागरी भागांसाठी विशेष उपाययोजना करणे, अशी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. यानुसार, कोकण विभागासाठी सात कोटी १६ लाख ८९ हजार, नाशिक विभागासाठी २७ कोटी ६४ लाख ८८ हजार, औरंगाबाद विभागासाठी ९५ कोटी ९८ लाख सहा हजार आणि अमरावती विभागासाठी १२ कोटी ५५ लाख २८ हजार रुपये देण्यात आले आहेत.