बाटलीबंद पाण्याला २० रुपये अन् दुधाला १७ रुपये दर, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:50 AM2020-07-21T11:50:31+5:302020-07-21T12:14:53+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडून दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडून दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील रामलिंग मंदिरात राजू शेट्टी यांनी दुग्धाभिषेक घालून आरती केली. यावेळी शंकर भगवानाला दुग्धाभिषेक करुन राज्य आणि केंद्र सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले.
पवित्र भावनेने आंदोलन हाती घेतले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेल ही आशा आहे, असे राजू शेट्टी म्हणाले. तसेच, आंदोलकांनी दूध ओतले तर त्याला नासाडी का म्हणायचे? पाण्यापेक्षा या अमृताला कमी भाव, आमच्या आया-बहिणी राबराब राबतात, त्या माऊलींच्या भावनांची किंमत नाही का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.
अमृतासारखे दूध रस्त्यावर ओतताना होणारा त्रास समजून घ्या. दूध उत्पादक शेतकऱ्याला केवळ १७-१८ रुपये दर मिळत आहे. बाटलीबंद पाण्याला २० रुपये आणि दुधाला १७ रुपये दर मिळत आहे, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असेही राजू शेट्टी यांनी म्हणाले.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी टँकरची फोडाफोडी करण्यात आली तर काही ठिकाणी देवाला अभिषेक घालून तर कुठे बैलांना दुधाची आंघोळ घालून आंदोलन सुरु झाले.
साताऱ्यात टँकर चालकास दुधाचा अभिषेक घातला
सातारा - कराड जवळ वाठार येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टँकर अडवून टँकर चालकास दुधाचा अभिषेक घातला. दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी राजू शेट्टी यांनी आज राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत वाठार येथे दूध टँकर रोखण्यात आला पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या चार कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेतले आहे.
आणखी बातम्या...
Oxford नंतर चीनची लस होतेय यशस्वी, कोरोनाशी लढण्याची वाढवते ताकद...
मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन
दूध तापलं! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला...
CoronaVirus News : धक्कादायक! मल्टीनॅशनल कंपनीत कोरोनाचा विस्फोट, २८८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह
रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा
सरकारी कर्मचार्यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...