पनवेल महापालिकेला सहा महिन्यांत २८० कोटींचा निधी
By admin | Published: May 22, 2017 02:15 AM2017-05-22T02:15:15+5:302017-05-22T02:15:15+5:30
विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, केंद्रात, राज्यात तसेच सिडकोसारखे महामंडळ भाजपाच्या ताब्यात असल्यामुळे या ठिकाणचा विकास आम्हीच करू शकतो
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, केंद्रात, राज्यात तसेच सिडकोसारखे महामंडळ भाजपाच्या ताब्यात असल्यामुळे या ठिकाणचा विकास आम्हीच करू शकतो. पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन केवळ ६ महिने झाले आहेत. मात्र, आतापर्यंत २८० कोटी रुपयांचा निधी पनवेलसाठी मंजूर केला आहे. त्यामुळे या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी खारघर येथील सभेत दिले.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यावर पनवेलमधील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे पनवेल महापालिका भाजपाच्याच ताब्यात येईल. महाराष्ट्रातील ५० टक्के लोकसंख्या शहरात राहते. शहरीकरण होताना नियोजनबद्ध विकास गरजेचा आहे. २०१९पर्यंत महापालिका क्षेत्रात एकही बेघर रहिवासी राहू नये, अशी आमची इच्छा आहे. यासंदर्भात प्रशांत ठाकूर यांच्या प्रस्तावाला नक्कीच मंजुरी देऊ व येथील बेघर रहिवाशांना घरे मिळवून देऊ. येथील लीज होल्डवरील जमिनी फ्री होल्ड करू याकरिता समितीचीदेखील स्थापना करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेतील घनकचरा, सांडपाण्याचे योग्य नियोजन करून प्रक्रिया केलेले सांडपाणी एमआयडीसीला देऊन त्यामधून पालिकेला उत्पन्न स्रोत मिळवून देऊ.
नवी मुंबई विमानतळासाठी १५ वर्षांपासून रखडलेल्या विविध परवानग्या मोदी सरकारने केवळ २ वर्षांत पूर्ण केल्या. या ठिकाणी मे २०१८पर्यंत मेट्रो धावेल, तसेच एकूण १०६ कि.मी.चे मेट्रोचे जाळे पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राने भाजपाला कौल दिला आहे. पनवेलकरदेखील नक्कीच कौल देतील, असा विश्वासही या वेळी त्यांनी व्यक्त केला.
उपस्थितांमध्ये खा. हरिवंश सिंह, रामशेठ ठाकूर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री जयकुमार रावल, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नागो गाणार, जयदीप कवाडे, जगदीश गायकवाड, शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह खारघरमधील तीनही प्रभागांतील उमेदवार उपस्थित होते.