दूधाची भुकटी बनवणाऱ्या संस्थांना प्रतिलिटर 3 रुपये अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:27 PM2018-05-08T16:27:54+5:302018-05-08T16:27:54+5:30

ध भुकटी उत्पादित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय

Rs 3 / - per liter for milk processing companies | दूधाची भुकटी बनवणाऱ्या संस्थांना प्रतिलिटर 3 रुपये अनुदान

दूधाची भुकटी बनवणाऱ्या संस्थांना प्रतिलिटर 3 रुपये अनुदान

Next

मुंबई -  दूध उत्पादकांना योग्य दर देता यावा यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी उत्पादित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दिली. या निर्णयाच्या परिणामी दूध उत्पादकांना निश्चितपणे योग्य दर मिळेल, असा विश्वासही जानकर यांनी व्यक्त केला आहे.

जानकर यांनी पुढे माहिती दिली की, राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचे उत्पादन झालेले आहे. याच काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय  बाजारात दूध भुकटीचे दरही घसरलेले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरलेल्या दूध भुकटीच्या दरामुळे दूध भुकटी प्रकल्पधारकांचा कल कमी दूध भुकटी तयार करण्याकडे असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत दूध भुकटी प्रकल्पधारक दूध भुकटी निर्मितीकरीता शेतकऱ्यांकडून कमी दराने दूध खरेदी करतात. याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होतो.

मार्च 2018 अखेर रोजी 26506.70 मेट्रीक टन इतका दूध भुकटी साठा शिल्लक आहे. या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होऊ नये यासाठीदूध भुकटी प्रकल्पधारकांना अधिक दूध भुकटी उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी आज मंत्रीमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या नुसारशासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील 30 दिवसांच्या कालावधीमध्ये मार्च 2018 मध्ये उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान 20 टक्के अधिक दूध भुकटीचे उत्पादन करणाऱ्या सहकारी व खाजगी दुध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी बनविण्याकरिता वापरलेल्या दूधासाठी प्रति लिटर 3 रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दूध भुकटी प्रकल्पधारकांना प्रति लिटर दूध रुपांतरणासाठी 3 रुपये इतके अनुदान दिल्यास खाजगी व सहकारी दूध उत्पादकांमार्फत सद्य:स्थितीत रुपांतरीत करण्यात येणाऱ्या प्रति दिन अंदाजे 36 लाख 41 हजार लिटर दुधासाठी 1 कोटी 9 लाख 23 हजार रुपये इतके अनुदान दररोज शासनाकडून दिले जाणार आहे. संपूर्ण 30 दिवसाचा कालावधी लक्षात घेता, अंदाजे 32 कोटी  76 लाख रुपये इतके अनुदान शासनामार्फत प्रोत्साहनपर अनुदान म्हणून दिले जाणार आहे. दूध भुकटी प्रकल्पधारकांना माहे मार्च,2018 मध्ये त्यांनी उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान 20 टक्केअधिक दूध भुकटीचे उत्पादन केल्यावर याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या दूध खरेदीवर होणार असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचारही या निर्णयामागे असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Rs 3 / - per liter for milk processing companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.