मुगाला मिळणार ४२५ रुपये बोनस!
By Admin | Published: September 24, 2016 03:08 AM2016-09-24T03:08:21+5:302016-09-24T03:08:21+5:30
आधारभूत दराने खरेदी करणारे पहिले केंद्र उघडले अकोल्यात.
अकोला, दि. २३- शासनाच्या आधारभूत दराने शासकीय मूग खरेदीला राज्यात प्रथम अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती येथून प्रारंभ झाला आहे. त्यानंतर राज्यात ४९ मूग खरेदी केंद्र उघडण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मुगाला यावर्षी प्रतिक्विंटल ४२५ रुपये बोनस दिला जाणार आहे.
आधारभूत खरेदी केंद्रावर एफएक्यू दर्जाच्या मुगाची खरेदी होत असून, दर ४,८00 रुपये प्रतिक्विंटल व बोनस ४२५ रुपये प्रतिक्विंटल शासनाने जाहीर केला आहे. शेतकर्यांना आपला शेतमाल स्वच्छ करू न व वाळवून तसेच सोबत ओळखपत्र, सात-बारा मूग पेरणीचा दाखला आणावा लागणार आहे. महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंगद्वारे मुगाची खरेदी केली जात आहे. राज्यात यावर्षी मुगाचे क्षेत्र वाढले असून, काही ठिकाणी एकरी ५ ते ६ क्विंटल मुगाचे उत्पादन झाले आहे; पण गत दोन महिन्यांपूर्वी ९ ते १0 हजार रुपये क्विंटल असलेले मुगाचे दर आजमितीस सरासरी ४,६0५ रुपये प्रतिक्विंटलवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. मुगाची आधारभूत किंमत ४,८00 रुपये प्रतिक्विंटल आहे. बाजारात मात्र सरासरी ४,६0५ प्रतिक्विंटल दर आहेत. याचे कारणच आधारभूत दराने खरेदी करताना अनेक चाळण्या लावण्यात आल्याने शेतकर्यांना बाजारात विकण्यापासून पर्याय उरला नाही. परिणामी, बाजारात शेतकर्यांची प्रचंड लूट होत आहे.