रश्मी शुक्लांवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नाना पटोलेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 08:31 AM2022-03-07T08:31:34+5:302022-03-07T08:31:56+5:30

धारावी पुनर्विकास घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीची मागणी

Rs 500 crore defamation suit against Rashmi Shukla; Nana Patole's announcement | रश्मी शुक्लांवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नाना पटोलेंची घोषणा

रश्मी शुक्लांवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नाना पटोलेंची घोषणा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंध लावून तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी माझे फोन टॅप केले. याविरोधात रश्मी शुक्ला यांच्यासह संबंधितांवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी जाहीर केले. तसेच, धारावी पुनर्विकास प्रकल्पातील ८०० कोटींच्या घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचेही पटोले यांनी सांगितले.

टिळक भवन या काँग्रेस कार्यालयातील एक कार्यक्रमानंतर पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फोन टॅपिंग, धारावी प्रकल्पातील भ्रष्टाचार, ओबीसी आरक्षण आदी विषयांवर भाष्य केले. पटोले म्हणाले की, रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे माझे फोन टॅप केले. त्यासाठी अमली पदार्थांच्या व्यापाराशी माझा संबंध लावून अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवून फोन टॅप करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  तेव्हा फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि गृहखातेही त्यांच्याकडेच होते. या फोन टॅपिंगमध्ये त्यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित केला. आता या प्रकरणी रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहे, असे पटोले म्हणाले. 

धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात फडणवीस सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला. प्रकल्पासाठीच्या ४५ एकर जमिनीसाठी फडणवीस सरकारने रेल्वेला ८०० कोटी दिले. परंतु, ना जमीन मिळशी ना ८०० कोटी परत आले. ही जनतेच्या पैशाची लूट आहे, असे सांगतानाच एसआयटी किंवा अगदी ईडी व सीबीआयला या प्रकरणाच्या चौकशीसाठी शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे पटोले म्हणाले. 


ओबीसी आरक्षणाबाबत अडवणुकीची भूमिका
ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही भाजपकडून अडवणुकीची भूमिका घेतली गेली आहे. आरक्षण संपवायचे हा त्यांचा डाव आहे. 
भाजप मंडल आयोगाच्या शिफारशीच संपवायला निघाले आहे. पण हा डाव आम्ही हाणून पाडू, असेही ते म्हणाले.

Web Title: Rs 500 crore defamation suit against Rashmi Shukla; Nana Patole's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.