एसटीला शासनाकडून ५८८ कोटींचा रोख परतावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 05:52 AM2019-03-13T05:52:59+5:302019-03-13T05:53:17+5:30
देणी भागविण्यास मदत; एकूण १,२०० कोटींचा मिळाला परतावा
- चेतन ननावरे
मुंबई : एसटी महामंडळाकडून विविध प्रवासी वर्गाला प्रवासी भाड्यात देण्यात येणाऱ्या सवलतींचा परतावा राज्य शासनाने दिला आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाला थकीत देणी भागवण्यास मदत होईल. या प्रवास सवलत मूल्याची रक्कम ५८८ कोटी २३ लाख ८७ हजार ४०३ इतकी आहे.
एसटीकडून तूर्तास २४ समाजघटकांना विविध प्रकारच्या २७ योजनांमधून प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. त्यासाठी एसटीने शासनाकडे संबंधित सवलत प्रतिपूर्ती रोखीने वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास मान्यता देत शासनाने रोखीने ही रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला.
दरवर्षी सुमारे ३८ कोटी प्रवासी एसटीच्या प्रवास भाडे सवलतीचा लाभ घेतात. त्यासाठी सुमारे १३०० कोटींची सवलत एसटी प्रशासन देते. त्याप्रमाणे २०१८-१९ सालातील पहिल्या टप्प्यात एसटीला शासनाने ६०७ कोटी ७४ लाख ७२ हजार ३९८ रुपये रोखीने वितरित केले होते. त्यानंतर पुन्हा सुमारे ५८८ कोटी रुपयांचा परतावा दिल्याने यंदा वर्ष संपण्याआधीच एसटीकडून विविध समाजघटकांना सुमारे १ हजार २०० कोटींपर्यंत सवलत दिली आहे. पूर्वी एसटीला याच रकमेसाठी शासनाला विनवणी करावी लागत होती. मात्र यंदा शासनाकडून तातडीने मिळालेल्या परताव्यामुळे एसटीच्या आर्थिक व्यवहारांची गाडी सुरळीत चालण्यास मदत होईल.
यामध्ये विविध १५ योजनांमध्ये प्रवाशांना १०० टक्के सवलत दिली जाते. त्यात स्वातंत्र्यसैनिकांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार, अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आणि इतर घटकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, क्षयरोगी व कर्करोगी अशा विविध समाजघटकांना सध्या एसटीसह शिवशाही बसेसमध्ये विविध टक्के प्रवासी सवलत दिली जाते.