केडीएमसी स्मार्ट सिटीसाठी ६ हजार ५०० कोटींचा आराखडा

By Admin | Published: October 4, 2015 04:19 AM2015-10-04T04:19:19+5:302015-10-04T04:19:19+5:30

कल्याण-डोंबिवलीतील युवकांना रोजगारासाठी दीड-दोन तासांचा धक्काबुक्की आणि घुसमटत प्रवास करावा लागणार नाही. या ठिकाणीच एक लाख नोकऱ्या पहिल्या टप्प्यात

Rs 6,500 crore plan for KDMC Smart City | केडीएमसी स्मार्ट सिटीसाठी ६ हजार ५०० कोटींचा आराखडा

केडीएमसी स्मार्ट सिटीसाठी ६ हजार ५०० कोटींचा आराखडा

googlenewsNext

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील युवकांना रोजगारासाठी दीड-दोन तासांचा धक्काबुक्की आणि घुसमटत प्रवास करावा लागणार नाही. या ठिकाणीच एक लाख नोकऱ्या पहिल्या टप्प्यात आणि त्या नंतरच्या टप्प्यात मोजता येणार नाहीत एवढ्या संधी निर्माण होणार आहेत. या ठिकाणीच वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी राज्य शासनाने ६ हजार ५०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. एवढेच नव्हे, तर स्मार्टसह सेफ सिटीसाठीही या महापालिकेला प्राधान्य दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत भाजपाच्या विकास परिषद कार्यक्रमात केली.
६,५०० कोटींमध्ये ३०० कोटी पाणी नियोजनासाठी, ३०० कोटी घनकचरा निर्मूलन, १८२२ कोटी रस्ते, आरोग्यासाठी १५०० कोटी, एसआरए योजनेसाठी १ हजार कोटी, प्रदूषणमुक्तीसाठी १७२ कोटी यासह विविध सुधारणा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठीचा कृती आराखडा तयार असून त्यातून स्मार्ट सिटी निर्माण केली जाणार आहे. राज्यात विविध प्रकल्पांसाठी गुंतवणूक करण्यासाठी जपानसह चीन हे देश तयार असून त्या दृष्टीने बोलणीही सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. त्यात ऐतिहासिक कल्याण आणि सांस्कृतिक नगरी असलेले डोंबिवली कसे काय वंचित ठेवले जाणार, असे ते म्हणाले.
नागपूरवगळता बहुतांशी ठिकाणी पाणीगळती आणि त्याच्या पुरवठ्यातील नियोजनाचा अभाव असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. त्या होऊ नयेत, यासाठी चांगले नियोजन आणि पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शक कारभार यांच्या माध्यमातून आपण ही शहरे स्मार्ट करणार आहोत. ही केवळ आश्वासने नसून आगामी काळात प्रत्यक्ष कृतीतून ते आपल्याला दिसेल, असेही ते म्हणाले.
सुरक्षित शहरांबाबत ते म्हणाले की, पुणे शहरासारखी यंत्रणा येथे कार्यान्वित होणार असून देशातील केवळ एकमेव पुणे शहर पूर्णत: सीसी कॅमेऱ्यांमध्ये बंदिस्त आहे. त्यामुळे कोणत्याही गैरव्यवहारावर लक्ष ठेवण्यास साहाय्य होत आहे. शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही सुरक्षा त्यातून ठेवली जात आहे. त्यामुळे पालकांची चिंता मिटवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी काळात सरकारची गुणवत्ता, परिणामकारकता आणि दिलेल्या सर्व आश्वासनांचे-सेवांचे उत्तरदायित्व या निकषांवर काम करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी व्यासपीठावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे, खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार, किसन कथोरे, गणपत गायकवाड, मंगलप्रभात लोढा आदींसह माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शशिकांत कांबळे, राहुल दामले, आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कोळसेवाडी आमदार गणपत गायकवाड यांच्या संपर्क र्कायालयाचे उद्घाटन केले.

Web Title: Rs 6,500 crore plan for KDMC Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.