यूपीआय अॅप्सद्वारे लांबविले साडेनऊ कोटी
By admin | Published: March 10, 2017 01:20 AM2017-03-10T01:20:48+5:302017-03-10T01:20:48+5:30
यूपीआय अॅप्सचा वापर करून जिल्ह्यातील तब्बल १ हजार २१४ बँक खात्यांतून आॅनलाइन पद्धतीने परस्पर ९ कोटी ४३ लाख ६७ हजार ५६१ रुपये लांबविण्यात आल्याचे समोर आले आहे.
औरंगाबाद : यूपीआय अॅप्सचा वापर करून जिल्ह्यातील तब्बल १ हजार २१४ बँक खात्यांतून आॅनलाइन पद्धतीने परस्पर ९ कोटी ४३ लाख ६७ हजार ५६१ रुपये लांबविण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, बहुतांश खातेदार बँक आॅफ महाराष्ट्रचे असून, यात औरंगाबाद शहरातील ८०० खातेदारांचा सहभाग आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, यूपीआय अॅप्लिकेशन डाऊनलोड करून अँड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून मित्र आणि परिचयातील लोकांचीच फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याविषयी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत:, बँक आॅफ महाराष्ट्रच्या ग्राहकांची संख्या यात अधिक असल्याने या बँकेकडून रेकॉर्ड मागविले आहे.
तसेच एचडीएफसी बँकेच्या खातेदारांना यूपीआय अॅप्सच्या माध्यमातून शेकडोंना गंडविल्याच्या तक्रारी सायबर क्राइम सेलकडे आल्या आहेत. महाराष्ट्र बँकेच्या सावरकर चौक शाखेतील सर्वात जास्त म्हणजे १७५ खातेदारांच्या खात्यांतून १ कोटी ३१ लाख ४५ हजार १३० रुपये दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ जेएनईसी कॉलेजजवळील शाखेतील १२५ खातेदारांचे ९२ लाख ८१ हजार १५१ रुपये पळविण्यात आले. या सर्व व्यवहारांचा तपशील बँकांकडून मागविण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)
- मित्र, नातेवाईक, एकाच संस्थेत काम करणारे हे अनेकदा एकमेकांना मोबाइल वा सीमकार्ड देतात. याच चांगुलपणाचा गैरफायदा आरोपींनी घेतला आहे. अनेकांना त्यांनी जन-धन खात्यातून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले, अशी माहिती अमितेशकुमार यांनी दिली.