रा.स्व. संघाचे मंत्रिमंडळाचे ‘बौद्धिक’ रद्द!
By admin | Published: December 2, 2014 02:51 AM2014-12-02T02:51:03+5:302014-12-02T02:51:03+5:30
रा.स्व. संघाची विचारसरणी, ध्येय-धोरणे आणि सार्वजनिक जीवनातील व्यक्तिंची चारित्र्यशुद्धता यावर मार्गदर्शन करण्यासाठी संघाने राज्यातील भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा बौद्धिक वर्ग आयोजित केला होता.
मुंबई : राष्ट्रीय स्वंयसेवक संघ घेणार मंत्रिमंडळाचे बौद्धिक, या वृत्तावर समाजाच्या सर्वस्तरातून उमटलेली उलटसुलट प्रतिक्रिया आणि फडणवीस सरकार संघाच्या दबावाखाली काम करत असल्याचा झालेल्या आरोपामुळे संघाने आपला बौद्धिक वर्गच रद्द करून टाकला.
रा.स्व. संघाची विचारसरणी, ध्येय-धोरणे आणि सार्वजनिक जीवनातील व्यक्तिंची चारित्र्यशुद्धता यावर मार्गदर्शन करण्यासाठी संघाने राज्यातील भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा बौद्धिक वर्ग आयोजित केला होता.
२ डिसेंबर रोजी होणाऱ्या या विशेष ‘हिवाळी वर्गात’ संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी हे या मंत्र्यांना नागपूरच्या संघ मुख्यालयात मार्गदर्शन करणार होते. या बौद्धिक वर्गाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटली. फडणवीस यांचे सरकार संघाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यानंतर संघ आणि भाजपमधील नेत्यांच्या अशा बैठका नेहमीच होत असतात. त्याकडे वेगळ्या दृष्टिने पाहू नये, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केली होती.
सूत्रांनी सांगितले की बौद्धिकाआधीच माध्यमांतून या विषयावर प्रचंड चर्चा झाल्याने संघातर्फे हा विशेष हिवाळी वर्ग रद्द करण्यात आला. भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने उद्याचा ‘वर्ग’ रद्द झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. रद्द झालेली शिकवणी वर्ग पुन्हा कधी होणार, हे मात्र अद्याप कळविण्यात आलेले नाही. (विशेष प्रतिनिधी)