पोलिसांच्या भत्त्यात हजार रुपयांची वाढ, गणवेशासाठी मिळणार अधिक रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 12:23 PM2023-01-06T12:23:42+5:302023-01-06T12:23:57+5:30
गृह विभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे.
मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याआधी अधिकाऱ्यांना वार्षिक पाच हजार रुपये गणवेश भत्ता मिळत होता. आता पोलिस उपनिरीक्षक ते अपर पोलिस अधीक्षक या अधिकाऱ्यांना सहा हजार रुपये भत्ता मिळणार आहे.
गृह विभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. गणवेश भत्त्यामध्ये वाढ केली जावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर गृह विभागाने पोलिसांची ही मागणी मान्य करून एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला.
नुकतेच पोलिस वसाहतींच्या दुरुस्तीसाठी डीपीडीसीमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानंतर आता गणवेश भत्त्याबाबतचा आणखी एक दिलासा देणारा निर्णय शिंदे - फडणवीस सरकारकडून घेण्यात आला आहे. याआधी गणवेश भत्ता देण्याऐवजी गणवेशाचे साहित्य दिले जात होते.
अनेक दिवस हीच पद्धत सुरू होती. मात्र, २०२१ मध्ये साहित्य देणे बंद करून त्याऐवजी पोलिस अधिकाऱ्यांना गणवेश भत्ता देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला.